आझमगढ: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. उत्तर प्रदेशच्या आझमगढमधील अहरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पुरा गावाजवळ मृतदेहाचे पाच तुकडे सापडले. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. पोलीस कारवाईदरम्यान आरोपीनं हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत आरोपी जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गावाजवळील रस्त्यालगत सापडलेले मृतदेहाचे तुकडे एका विवाहित तरुणीचे आहेत. १५ नोव्हेंबरला ग्रामस्थांना रस्ताजवळ दुर्गंधी येऊ लागली. काही अंतरावर ग्रामस्थांना मृतदेहाचे तुकडे विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसले. टोकाच्या रागातून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पाच दिवसांनंतर पोलिसांनी संपूर्ण गुन्ह्याची उकल केली.
आफताबला १५ वर्षांपासून ओळखतोय, तो कधीच…; मोदीनं खूप काही सांगितलं; श्रद्धाबद्दलही बोलला
या प्रकरणी पोलिसांनी प्रिन्स यादवला अटक केली. त्याचे मृत तरुणीशी गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या कुटुंबांना याची कल्पना होती. काही महिन्यांपूर्वी प्रिन्स शारजाला कामासाठी गेला. एका जहाजावर मॅकेनिक म्हणून काम करू लागला. या दरम्यान त्याच्या प्रेयसीचा विवाह कुटुंबियांनी अन्यथ करून दिला. फेब्रुवारी २०२२ मध्ये लग्न सोहळा संपन्न झाला.

प्रेयसीच्या लग्नाबद्दल समजताच प्रिन्स घरी परतला. आई, वडिलांचा सल्ला घेतला. त्यांनी तरुणीशी बोलू नको, संपर्क ठेवू नको, असा सल्ला दिला. प्रिन्सनं प्रेयसीला सोबत राहण्यास सांगितलं. तिनं नकार दिला. यामुळे संतापलेला प्रिन्स अशरफपूरमध्ये मामाच्या घरी पोहोचला. प्रिन्सनं आई, वडील, भाऊ, बहिण, मावस भावाच्या मदतीनं तरुणीच्या हत्येचा कट रचला.
याला म्हणतात प्रेम! मृत प्रेयसीसोबत बांधली लगीनगाठ; कुटुंब, नातेवाईक सारेच गहिवरले
प्रिन्स तरुणीला भैरव धामला फिरायला घेऊन गेला. अशरफपूर जजऊघरजवळ असलेल्या एका ऊसाच्या शेतात प्रिन्सनं तरुणीची हत्या केली. यानंतर त्यानं तरुणीच्या मृतदेहाचे तुकडे केले. ते तुकडे एका गोणीत भरले आणि पुरा गावाजवळील विहिरीत फेकले. यानंतर प्रिन्स आणि त्याचा मावस भाऊ सर्वेश फरार झाले.

पोलिसांनी शनिवारी प्रिन्सला अटक केली. रात्रभर त्याची चौकशी केली. हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार जप्त करण्यासाठी पोलीस प्रिन्सला रविवारी सोबत घेऊन गेले. त्यावेळी त्यानं हत्यारानं पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत तो जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here