Sangli News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामधील तडवळे गावात वन विभागाच्या विमा नसलेल्या गाडीने चार वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात संसार उद्धवस्त झाला आहे. पती, चिमुकली गमावलेली महिला आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ही कहाणी आहे आटपाडी तालुक्यातील तडवळे गावच्या गटकुळे कुटूंबाची. चार वर्षांपूर्वी वन विभागाच्या विमा नसलेल्या गाडीने दिलेल्या धडकेत आटपाडी तालुक्यातील सीमा गटकुळे या महिलेचा संसार उद्धवस्त झाला. अपघातात सीमा यांच्या पती आणि 3 वर्षाच्या मुलीचे निधन झाले होते. वन विभागाची अपघातग्रस्त गाडी होती ती गाडी वन विभागाचा एक अधिकारी चालवत होता. शिवाय गाडीचा विमा नसल्याने सीमा यांच्या कुटुंबाला या अपघातानंतर  विमा कंपनीकडून किंवा वन प्रशासनाकडून मदत झालेली नाही. त्यामुळे या कुटुंबाचे ज्याच्यामुळे छत्र हरपले त्यांनी तरी मदत करावी अशी या कुटुंबाची मागणी आहे.

चार वर्षांपूर्वी भीषण अपघात 

या भीषण अपघाताची घटना 12 नोव्हेंबर 2018 मध्ये घडली होती. अपघातात आटपाडी तालुक्यातील तडवळे गावचे अनिल धर्मदास गटकुळे आणि अवनी गटकुळे ही चिमुकली ठार झाली. पत्नी सीमा या गंभीर जखमी झाल्या. या अपघाताला जबाबदार होते ते सांगली वन विभागातील विटा विभागातील वन विभागाचे वाहन आणि तेथील वनक्षेत्रपाल सागर मगर. चालक असतानाही या वनक्षेत्रपालाने वाहन चालवायला घेतले होते आणि वाहनावरचा ताबा सुटल्याने दुचाकीवरील तिघांना उडवले. त्या वन विभागाच्या वाहनाचा विमा देखील वन विभागाने न उतरवल्याने अपघातग्रस्त कुटूंबाला मदत मिळू शकली नाही. यामुळे एकीकडे सीमा याचा संसार उद्धवस्त झाला आणि दुसरीकडे अनिल यांच्या आई, मुलासह जगण्याचा संघर्ष करावा लागत आहे, आजही तो  अपघाताचा क्षण आठवला की भीती वाटते असे अनिल यांची पत्नी सीमा सांगतात.

संबंधित अधिकारी पुन्हा सेवेत

या अपघातात सीमा गटकुळे देखील गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर काही शस्त्रक्रिया देखील झाल्या. याचा खर्च करण्यास देखील वन विभाग पुढे आले नाही. सीमा यांच्या आई-वडिलांनीच त्यांच्या शस्त्रक्रियेचा खर्च केला. मात्र, आजही अपघाताने होणारा त्रासही आजही सतावत आहे. त्यामुळे त्यांना जास्त काळ धावपळीचे काम करणे देखील होत नाही. अशा परिस्थितीत मुलगा, त्याचे शिक्षण आणि अनिल यांच्या वृद्ध आईचा कसा सांभाळ करायचा हा मोठा प्रश्न सीमा याना सतत सतावत असतो. ज्यांच्या हातून अपघात झाला त्या अधिकाऱ्यावर वन विभागाकडून एक वर्ष निलंबनाची कारवाई झाली आणि पुढे आता पुन्हा तो सेवेत देखील रुजू झाला आहे. परतुं, ज्याच्या हातून हा अपघाताचा गुन्हा घडला त्याला काय शिक्षा मिळाली असा प्रश्नही कुटुंब विचारत आहे. यावर मात्र सध्या वन विभागाचे कुणीही अधिकारी त्या कुटुंबाल मदत देण्याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत.

Reels

निदान जगण्यापुरता आर्थिक हातभार लावावा

आपल्या मुलाचे अशा पध्दतीने अपघातात झालेले निधन अनिल यांची आई देखील अजूनही विसरू शकलेली नाही. आपल्या सुनेचा आणि नातवाचा दररोज जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष आणि नातवाची केवळ पैशाविना शिक्षणासाठी होणारी आबाळ पाहून ज्याच्या कडून हा अपघाता घडला त्या वन विभागाने तरी अनिलच्या कुटूंबाला निदान जगण्यापुरता आर्थिक हातभार लावावा अशी अपेक्षा करत आहे.

केवळ वन विभागाच्या त्या गाडीचा विमा नसल्याने दोन जणांचा जीव जाऊन देखील गटकुळे कुटुंबाला कोणतीच शासकीय मदत मिळू शकलेली नाही. मग अशा पध्दतीने अपघातात मयत झालेल्या आणि ज्याचे संसार आणि कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेलेल्या कुटुंबाला न्याय आणि नुकसानभरपाई मिळणार नसेल तर अशा पध्दतीने उद्धवस्त झालेल्या संसाराचे वाली कोण? हा प्रश्न सगळ्या व्यवस्थेला विचारावा लागणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here