shivsena aditya thackeray, आमदारकीला ३ वर्ष पूर्ण होताच आदित्य ठाकरेंचं मतदारांना भावुक पत्र; वरळीत वेळ खर्च करणाऱ्या भाजपचाही समाचार – shivsena aditya thackeray emotional letter to the voters of worli assembly constituency after completing 3 years as an mla
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आज ३ वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघातील नागरिकांना एक भावुक पत्र लिहिलं आहे. तसंच या पत्रातून भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून लोक हिताचा विचार करणारे सरकार पाडलं गेलं. पण ते आम्हाला निःस्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून रोखू शकणार नाहीत. आम्ही तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करतच राहू आणि हेच आम्हाला पुढे ऊर्जा देत राहील,’ असं आदित्य यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर मागील ३ वर्षात राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने महाविकास आघाडी केली आणि राज्यात नवं सरकार स्थापन केलं. या सरकारला अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होताच तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देत ४० आमदारांसह भाजपसोबत जात मुख्यमंत्रिपद मिळवलं. राजकीयदृष्ट्या अस्थिर झालेल्या या काळातही आपण मतदारसंघात चांगलं काम करू शकल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. Rohit Pawar : कर्जत-जामखेडमधील जलसंधारणाच्या कामांना स्थगिती, रोहित पवारांचा राम शिंदेवर थेट आरोप
आदित्य ठाकरे यांनी वरळीकरांना संबोधित करत लिहिलेलं पत्र :
‘महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड होऊन ३ वर्षे झाली आहेत. या ३ वर्षांत आपल्या प्रेमाने मला आशीर्वादित केले आहे आणि मी प्रार्थना करतो की हेच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्या सोबत राहोत. माझ्या निवडणुकीपूर्वी मी तुम्हाला वरळी A+ चे वचन दिले होते. गेल्या ३ वर्षात वरळीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सर्व एक संघ म्हणून काम करत आहोत. नवीन बस थांबे असोत, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते असोत, हिरव्यागार मोकळ्या जागा असो, किंवा सामुदायिक स्तरावर व वैयक्तिक स्तरावर लसीकरण ड्राइव्ह आणि इतर समस्येचे निराकरण असो आपण वरळीकरांच्या सहकार्याने करत आलो आहोत,’ अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मतदारसंघातील कामाबाबत माहिती दिली.
आपल्या कामाबद्दल माहिती देत असताना आदित्य यांनी भाजपकडून वरळी मतदारसंघात सुरू असलेल्या हालचालींवरूनही टोला लगावला आहे. ‘राजकीयदृष्ट्याही प्रत्येक पक्षाला देखील वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो. आपल्या वरळीवर त्यांचे लक्ष त्यांनी वरळीत लावलेले बेकायदेशीर बॅनर आणि त्यावर होणारा खर्च यामुळे मला खात्री पटते की वरळी हेवा वाटावा अशी प्रगती करतेय आणि त्यांना देखील वरळीत यावसं वाटत आहे,’ असं ते म्हणाले.