Auto indefinite strike : साखळी उपोषणाबरोबरच बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा चालकांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. बदलापूर शहर हे सध्याच्या घडीला बदलापूर गाव, सोनीवली, वडवली, साई वालीवली, माणकिवली, जुवेली, खरवई या गावाबाहेरच्या ग्रामीण पट्ट्यातही विस्तारत असून हे अंतर स्टेशन पासून किमान ५ ते ६ किलोमीटर इतकं आहे. त्यामुळे या भागातल्या प्रवाशांना स्टेशनला ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय.

बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रिक्षा स्टॅन्ड शुक्रवारी बदलापूर पालिकेने कारवाई करत जमीनदोस्त केलं. रेल्वेच्या होम प्लॅटफॉर्मसाठी आणि पादचारी पुलासाठी ही जागा लागणार असल्यानं हे रिक्षा स्टॅन्ड तोडण्यात आलं. वास्तविक हे रिक्षास्टॅन्ड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला स्थलांतरित करून मग तोडण्यात येणार होतं. त्यासाठी स्वतः बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी रिक्षा चालकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्थलांतराला सहमती दर्शवली होती. मात्र पर्यायी जागा देण्यापूर्वीच पालिकेने अनधिकृत गाळ्यांवर केलेल्या कारवाईसोबत रिक्षा स्टॅन्डवर सुद्धा कारवाई केली.
४ हजार रिक्षाचालकांचा सहभाग
यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकांनी बेमुदत संप पुकारला. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या संपाचा आजचा तिसरा दिवस असून यासोबतच रिक्षाचालकांनी साखळी उपोषण सुद्धा सुरू केलं आहे. रिक्षा चालकांच्या या बंदमध्ये बदलापूर शहरातील तब्बल ४ हजार रिक्षाचालक सहभागी झाले आहेत. यामध्ये बदलापूर पश्चिमेकडील ४५, तर बदलापूर पूर्वेकडील ३० स्टॅन्डवरील रिक्षा चालकांचा समावेश आहे.
सोबतच बारवी डॅम आणि मुरबाडकडे जाणाऱ्या काळ्यापिवळ्या टॅक्सीचालकांनी सुद्धा या बंदमध्ये सहभाग घेतला असून त्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या जवळपास ५० टॅक्सी सुद्धा बंद आहेत. परिणामी बदलापूर शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागात जाणारी रिक्षा आणि टॅक्सी सेवा संपूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा साहजिकच प्रवाशांना मात्र मनस्ताप सोसावा लागतोय. मात्र असं असूनही गेल्या तीन दिवसात नगरपालिकेचा एक अधिकारी आमच्याकडे पाहण्यासाठी किंवा आमच्याशी बोलण्यासाठी साधा फिरकलेला सुद्धा नसल्याची खंत रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, साखळी उपोषणाबरोबरच बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा चालकांनी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. बदलापूर शहर हे सध्याच्या घडीला बदलापूर गाव, सोनीवली, वडवली, साई वालीवली, माणकिवली, जुवेली, खरवई या गावाबाहेरच्या ग्रामीण पट्ट्यातही विस्तारत असून हे अंतर स्टेशन पासून किमान ५ ते ६ किलोमीटर इतकं आहे. त्यामुळे या भागातल्या प्रवाशांना स्टेशनला ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे बदलापूर पालिकेने लवकरात लवकर रिक्षा चालकांशी बोलून त्यांच्या संपावर तोडगा काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.