सूर्यकुमारच्या फलंदाजीचे व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्या फटक्यांची चर्चा झाली. आता सूर्याच्या घरातील एक व्हिडीओ समोर आला आहे. सूर्याची बहिण डिनल यादवनं तिच्या इन्स्टा स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. सूर्यानं शतक करताच त्याच्या आईनं टाळ्या वाजवल्या. लेकाचं कौतुक करण्यासाठी आई टीव्हीजवळ आली. हेल्मेट काढून बॅट उंचावणाऱ्या सूर्याच्या चेहऱ्यावरून तिनं मायेनं हात फिरवला.
टीव्ही स्क्रिनवर दिसत असलेल्या सूर्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत आईनं त्याला भरभरून आशीर्वाद दिला. यावेळी सूर्याचे बाबा आनंदानं हसत होते. भारताच्या प्रत्येक कुटुंबात असंच चित्र दिसतं, अशा आशयाच्या कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत. लेकरांचं कौतुक करण्यात आई नेहमी आघाडीवर असते आणि अशा प्रसंगी बाबा दुरून आनंदानं हसत असतात.
काल झालेला सामना सूर्यानं भारताला एकहाती जिंकून दिला. टी-२० मध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज असलेल्या सूर्यानं कालही चौफेर फटकेबाजी केली. सूर्यानं न्यूझीलंडच्या गोलंदाजांना जोरदार हल्ला चढवत भारताला बिकट परिस्थितीतून बाहेर काढलं. किवी गोलंदाजांची धुलाई करत सूर्यानं शतक साजरं केलं. त्याच्या खेळीत ११ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. न्यूझीलंडचा डाव १२६ धावांत आटोपला. दीपक हुड्डानं ४ गडी बाद केले.