देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पृथ्वी शॉबद्दल आम्ही बोलत आहोत. तो आतापर्यंत भारतासाठी १२ सामने खेळला आहे. यामध्ये एकदिवसीय सामन्यांची संख्या ६, ५ कसोटी आणि १ टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आहे. शॉ देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत स्वत:ला सिद्ध करत आहे, पण त्याला टीम इंडियामध्ये बोलावलं जात नाही. टी-२० वर्ल्डकपसाठीही त्याला संघात स्थान मिळू शकले नाही. शॉने जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-२० म्हणून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. पृथ्वी अलीकडेच विजय हजारे ट्रॉफी वनडे स्पर्धेत मुंबईकडून खेळताना दिसला.
चांगली सुरुवात करणारा सलामीवीर…
टीम इंडियामध्ये अनेक तरुणांना संधी मिळत आहे, पण पृथ्वी त्याच्या संधीची वाट पाहत आहे. पृथ्वीकडे अतिशय वेगवान सुरुवात करण्याची क्षमता आहे. मिझोरामविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याने १३८ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. पृथ्वीने ३९ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावा ठोकल्या. तो सलामीची जबाबदारी पार पाडतो आणि अशा स्थितीत तो संघाला वेगवान सुरुवात करून देऊ शकतो.
T20 मध्ये झळकावली शतकं…
पृथ्वीने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत फक्त एकच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाने ५ कसोटी, ६ एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. त्याने कसोटीत एक शतक आणि २ अर्धशतकांसह ३३९ धावा केल्या आहेत. अशात, एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३१.५ च्या सरासरीने १८९ धावा केल्या. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. त्याने टी-२० च्या एकूण कारकिर्दीत ९२ सामन्यांमध्ये २४०१ धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये झळकावली २० शतके
पृथ्वी शॉने फर्स्ट क्लासमध्ये ११ आणि लिस्ट ए मध्ये ९ शतके झळकावली आहेत. आयपीएल २०२२ मध्येच त्याने १० सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह २८३ धावा केल्या होत्या. यानंतर त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. गेल्या महिन्यात त्याने उत्तर विभागाविरुद्ध ११३ आणि दक्षिण विभागाविरुद्ध ६० आणि १४२ धावा केल्या होत्या.