कानपूर: कानपूरच्या गावात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गँगस्टर आणि त्याच्या गुंडांनी बेछुट गोळीबार केला. यात आठ पोलीस शहीद झाले होते. या घटनेनंतर विकास दुबे चर्चेत आला होता. त्यानंतर दुबे पोलीस चकमकीत मारला गेला. आता त्याची एकेक खळबळ उडवून देणारी क्रूरकृत्ये उघड होत आहेत.

बिकरू गावात २ जुलैच्या मध्यरात्री पोलिसांवर हल्ला झाला होता. अशी घटना पहिल्यांदाच घडली नव्हती. यानं याआधीही पोलिसांवर हल्ला केला होता. २२ वर्षांपूर्वी ५ मे १९९८ रोजी बिकरू गावात पोलिसांनी एका प्रकरणात मुख्य आरोपी विकास दुबे याच्यासह दोघांना पकडलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यावेळी विकासची आई, पत्नी आणि भावासह १६ गुंडांनी पोलीस पथकावर हल्ला करून दोघांची सुटका केली होती. त्यानंतर ते फरार झाले होते.

विकास दुबेला त्यावेळी अटक करणारे पोलीस अधिकारी बिजेंद्र सिंह यांनी या प्रकरणात तक्रारही दाखल केली होती. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हद्दपार केलेल्या दोन आरोपींना पकडण्यासाठी पोलीस मुख्य आरोपी विकास दुबेच्या घरी गेले होते. खबऱ्यांनी इशारा केल्यानंतर पोलिसांनी विकास दुबेसह अन्य एका आरोपीला पकडले आणि पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यासाठी वाहनात बसवले. त्याचवेळी शस्त्रांसह गुंडांसोबत विकास दुबेची आई, पत्नी आणि भाऊ त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी पोलिसांना मारहाण केली आणि विकास दुबे आणि त्याच्या साथीदाराची सुटका केली. त्यावेळी पोलिसानं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, विकास दुबेने पोलिसांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या हल्ल्यात पोलिसांचे गणवेशही फाटले होते. आरोपीची गावात दहशत आहे. गुंडगिरीमुळं गावातील कुणीही त्याच्याविरोधात साक्ष देण्यासाठी पुढे येत नाही, असंही तक्रारीत त्यावेळी नमूद केलं होतं.

पोलीस चकमकीत मारला गेला विकास दुबे

२ जुलैच्या मध्यरात्री पोलीस पथकावरील हल्ल्यात आठ पोलीस शहीद झाले होते. या घटनेनंतर आरोपी विकास दुबे फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर बक्षीसही जाहीर केले होते. त्यानंतर बक्षीसाची रक्कम वाढवून ती पाच लाख रुपये करण्यात आली होती. विकास दुबे मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होता. महाकाल मंदिराबाहेर त्याला अटक करण्यात आली होती. उज्जैन पोलिसांकडून त्याचा ताबा घेतल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि एसटीएफचं पथक विकास दुबेला घेऊन कानपूरला येत होते. विकास दुबेला घेऊन येणारं पोलिसांचं वाहन रस्त्यावर उलटलं. ती संधी साधून विकास दुबेनं जखमी पोलिसाकडील पिस्तुल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबेला शरण येण्यास सांगितलं. मात्र, त्यानं पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या कारवाईत तो मारला गेला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here