पुण्यात विवाहित प्रियकराकडून प्रेयसीची हत्या
लग्नानंतर आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समजल्याने पत्नीने अबोला धरला. जिच्याशी प्रेमसंबंध होते, तिने देखील दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. या रागातून विवाहित तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरीत घडला आहे. महिलेचा गळा चिरुन त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही, तर खून केल्यानंतर याने प्रेयसीचा मृतदेह एका झुडपात फेकून दिला होता. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड पोलिसांच्या शाखा तीनच्या पथकाने गुन्हेगाराला अटक केली आहे.
निकिता संभाजाई कांबळे (वय २८) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. राम कुंडलिक सुर्यवंशी (वय ३९ रा. पवार वस्ती, दापोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रामचे साधारण पाच ते सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तो मॉलमध्ये काम करत होता. त्या ठिकाणी असणाऱ्या निकिता कांबळे या मुलीसोबत त्याची मैत्री झाली. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. काही दिवस मजेत गेल्यानंतर राम याला निकिताचे दुसरे कुणासोबततरी संबंध सुरू असल्याचा संशय त्याला आला होता. तसेच ती त्याच्या सोबत तुटक तुटक वागू लागली होती.
दुसरीकडे रामच्या पत्नीला पतीच्या बाहेरच्या संबंधाबद्दल समजले होते. त्यामुळे तिने देखील भांडण करत राम सोबत बोलणे बंद केले होते. त्यामुळे राम अवस्थ झाला होता. प्रेयसीच्या वागण्याचा राग रामच्या मनात घर करून होता. त्यामुळे त्याने निकिताचा गळा चिरला. तसेच तिचा मृतदेह ओळखता येऊ नये म्हणून तो दगडाने ठेचला होता. नंतर त्याने तो झुडपात फेकून दिला होता. याबाबत म्हाळुंगे पोलिसांत खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
आरोपीला पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत खराबवाडी परिसरातून एका तरुणी शनिवारपासून गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या तरुणीची ओळख पटवली. संबंधित तरुणीच्या फोनच्या लोकेशवरून संशयित म्हणून राम सुर्यवंशी याला सिंबोयासिस परिसरातून येथून ताब्यात घेतले.