१६ नोव्हेंबर रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या के.के मार्केटजवळ ही खुनाची धक्कादायक घटना घडली आहे. संकेत रामचंद्र अनबुले असे खून झालेल्या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. तर, लहू माने, विशाल अमराळे आणि त्याच्या इतर काही साथीदारांनी मिळून मयत संकेत रामचंद्र अनबुले यांचे अपहरण करून खून केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत रामचंद्र अनबुले हे कोरोना काळात मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यातून ते कर्जबाजारी झाले होते. या आर्थिक विवंचनेतून संकेत यांना क्रिकेट बेटिंगचा नाद लागला. क्रिकेट बॅटिंग जिंकण्यासाठी तो लहू माने आणि विशाल अमराळे यांच्याकडे क्रिकेट बेटिंग करू लागला.
यातूनच संकेतवर जवळपास २८ हजार रुपयांची उधारी झाली होती. ही उधारी वसूल करण्यासाठी आरोपींनी १६ नोव्हेंबरला संकेत रामचंद्र अनबुले याचं एका चार चाकी गाडीमध्ये अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर आरोपींनी के. के. मार्केट जवळील संकेत रामचंद्र अनबुले याला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत संकेत रामचंद्र अंनबुले हा गंभीर जखमी झाला होता.
संकेत रामचंद्र अनबुले हा पैसे देत नसल्याने आरोपींनी त्याच्या वडिलांकडून गुगल पेवर २८ हजार रुपये वसूल केले होते. पैसे वसूल केल्यानंतर आरोपींनी गंभीर जखमी झालेल्या संकेत रामचंद्र अंनबुले याची सुटका केली होती. मात्र संकेत घरी गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी लहू माने विशाल अमराळे आणि इतर काही आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.