मुंबईत सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामामुळे मत्स्यालयाच्या इमारतींना धक्का पोहोचला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही बाब समोर आली आहे.

 

aquarium
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः मुंबईत सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामामुळे मत्स्यालयाच्या इमारतींना धक्का पोहोचला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही बाब समोर आली आहे. त्यामुळे येथील इमारती लवकरच पाडल्या जाणार आहेत. दरम्यान, मुंबईत लवकरच नवीन मत्स्य संकुल आणि अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच केली आहे.

तारापोरवाला मत्स्यालयासंदर्भात आढावा बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली. मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत वरील माहिती समोर आली आहे. या आढावा बैठकीस मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव पराग जैन नानोटिया, मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंबईची ओळख असलेले तारापोरवाला मत्स्यालय गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांसाठी बंद आहे. तारापोरवाला मत्स्यालयाची इमारत जवळपास ७५ वर्षे जुनी आहे. तर बाजूची इमारतही ५० वर्षांहून अधिक जुनी आहे. मत्स्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामामुळे मत्स्यालयाच्या इमारतींना धक्का पोहोचला असून त्या धोकादायक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या इमारती लवकरात लवकर पाडण्याचे निर्देशही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सध्या तारापोरवाला मत्स्यालयात १६ सागरी पाण्याच्या टाक्यांमध्ये ३१ प्रकारचे मासे आहेत. तर गोड्या पाण्यातील आणि ३२ ट्रॉपिकल टाक्यांमध्ये ५४ प्रकारचे मासे आहेत. दरम्यान, हे नवीन जागतिक दर्जाचे मत्स्यालय सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर विकसित करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा. हे मत्स्यालय जगातील सर्वोत्तम मत्स्यालयापैकी एक गणले जावे, याचे नियोजन करण्याची सूचनाही मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here