सोन्याचे नकली दागिने दाखवून त्याबदल्यात वीस लाख रुपये घेऊन झव्हेरी बाजारातील सोने व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या चौघांना लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी हे एकाच कुटुंबातील असून एकमेकांचे नातेवाईक आहेत

 

mumbai police
म. टा. खास प्रतिनिधी मुंबईः सोन्याचे नकली दागिने दाखवून त्याबदल्यात वीस लाख रुपये घेऊन झव्हेरी बाजारातील सोने व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या चौघांना लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी हे एकाच कुटुंबातील असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. चोरी आणि फसवणुकीचा धंद्यातच कुटुंबातील सात ते आठ सदस्य आहेत. कुटुंबाचा म्होरक्या आपली मुले, मुली आणि जावयांना सोबत ही टोळी चालवत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

झव्हेरी बाजारात दिलेश पारेख यांचे जय ज्वेलर्स नावाने सोने चांदीच्या दागिने विक्रीचे दुकान आहे. २६ ऑक्टोबरला राजेश प्रजापती असे नाव सांगणारा एक तरुण त्याचा मित्र आणि एका महिलेसह दुकानात आला. त्यांनी घरातील जुने दागिने विकायचे असल्याचे सांगितले आणि त्यानुसार सोबत आणलेल्या दागिन्यांपैकी काही सोन्याच्या माळा दाखविल्या. पारेख या दागिन्यातील काही तुकडे कापून ‘महावीर टच’ या दुकानातून तपासणी करून घेतले. प्रति तोळा ४० हजार या दराने त्यांनी ५१० ग्रॅम दागिन्यांचे वीस लाख रुपये दिले. पारेख यांनी पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी दागिन्यातील काही तुकडे तपासणीसाठी पाठविले असता हे सोने नसून पिवळा धातू असल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर पारेख यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार केली.

लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे व्यापाऱ्याला गंडविणाऱ्यांचा शोध सुरु केला. सीसीटीव्हीने टिपलेले चेहरे खबऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर रवी कलानी आणि धर्म कलानी या दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून मिलेल्या माहितीवरून दिपाली रवी कलानी आणि पन्नालाल भट या दोघांना पकडण्यात आले. नारायण बघेल, सुभाष सलत आणि मीना राठोड हे आरोपी फरार आहेत. नारायण बघेल हा या टोळीचा म्होरक्या असून तो मुलगी दिपाली, जावई रवी, शंकर आणि सुभाष तसेच मीना राठोड यांना सोबत घेऊन व्यापाऱ्यांना गंडा घालतो. मीना ही रवीची मावशी आहे. या कुटुंबाने कधी खोदकाम करताना दागिने सापडले तर कधी जुनेपुराणे दागिने असल्याचे भासवून अनेक व्यापाऱ्यांना फसविले आहे. मात्र अटक होण्याची त्यांची पहिलीच वेळ असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here