नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सुहास कांदे यांच्या नाराजीवर आज नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी काही दिवसांपूर्वी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर शिंदे गटातील आमदारांमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा होती. मला विश्वासात घेतले जात नाही, बैठकांना बोलवले जात नाही, असे आरोप सुहास कांदे यांनी केले होते. यावर पालकमंत्री दादा भुसे यांनी त्यावेळी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मुख्यमंत्री यात लक्ष घालतील, असं म्हणत भुसे यांनी यावर बोलणं टाळलं होतं. दरम्यान आज नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री दादा भुसे यांनी यावर प्रतिक्रिया देताना आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत, कालही आम्ही सोबत होतो, उद्याही राहू, असं म्हणत ‘हम साथ साथ है’ असा दावा केला आहे.
दादा भुसे यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला आहे. १० महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास मंत्रालयाने आयुक्तांना दिले आहेत. प्रभाग रचनेबद्दल बोलताना पूर्वीप्रमाणेच प्रभाग रचना होणार असून यात थोडेफार बदल होणे अपेक्षित आहे, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. मात्र निवडणुका कधी होईल हे सांगता येत नाही, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली. लग्नानंतर अवघ्या ६ दिवसांत नवविवाहितेचं कुंकू पुसलं; हृदयविकाराच्या धक्क्याने पतीने गमावले प्राण
गोवर लसीकणाबाबत जनजागृती मोहीम
दोन दिवसांपूर्वी आधार आश्रमात ४ वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासोबतच नाशिकमध्ये गोवरचा प्रादुर्भाव पसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र मालेगावात काही लहान बालकांना गोवरचे डोस दिले नसल्याचं समोर आलं आहे. यावर बोलताना लसीकरण करण्याचे आदेश दिले असून मालेगावात लसीकरण जनजागृती मोहिमेत काही धार्मिक गुरूंनाही सहभागी करून घेणार आहोत, अशी माहिती दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कर्नाटक प्रश्न
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा धुमसत आहे. महाराष्ट्रातील ४० गावांवर कर्नाटकाने दावा केल्यानंतर राजकारण तापलं आहे. दरम्यान महाराष्ट्राचे नागरिक ही गोष्ट मुळीच सहन करणार नाही. खूप कष्टाने आपण महाराष्ट्र मिळवला आहे. १०५ हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं आहे. काही अडचणी असतील तर त्यावर एकत्र बसून मार्ग काढू, अशी भूमिका भुसे यांनी मांडली आहे.