Maharashtra Politics | उदयनराजे यांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा शरद पवार यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. शरद पवार बोलल्यानंतर उद्धव ठाकरे यांना बोलावेच लागते. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात पूर्वीपासून किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे आपल्याला माहिती आहे, अशी खोचक टिप्पणीही फडणवीस यांनी केली.

 

Devendra Fadnavis in Mumbai
अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • मी अमृताला कोणत्याही टिप्स देत नाही
  • अभिव्यक्ती केली तर त्याचे परिणाम हे भोगावेच लागणार
मुंबई: मी माझ्या पत्नीला कोणत्याही विषयावर कशाप्रकारे व्यक्त व्हायचे याच्या टिप्स किंवा ट्विट करण्याबाबत कोणत्याही गोष्टी सांगत नाही. माझ्या बायकोची सगळीच मतं मला पटतात असे नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते गुरुवारी मुंबईत बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही अमृता फडणवीस यांना एखाद्या विषयावर कशाप्रकारे मत मांडायचे, याविषयी मार्गदर्शन किंवा सूचना देता का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र यांनी म्हटले की, अमृता ही एक स्वतंत्र्य व्यक्ती आहे. त्यामुळे तिला तिचे विचार मांडण्याचे हक्क आहेत. मी अमृताला कोणत्याही टिप्स आणि ट्विट पण देत नाही. मी तिला नेहमी एवढेच सांगतो की, अभिव्यक्ती केली तर त्याचे परिणाम हे भोगावेच लागणार. ते परिणाम भोगण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्याप्रमाणे अमृता अनेकदा आपल्या ट्विट किंवा वक्तव्याचे परिणाम भोगतेही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे नेमकं आताच का बोलले; फडणवीसांचा सवाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी समाचार घेतला. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी कोश्यारी यांच्यावर आसूड ओढले. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे नेमके आताच का बोलले, याचा विचार केला पाहिजे. खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पत्रकारपरिषदेत शरद पवार यांच्याविषयी प्रश्न उपस्थित केले. कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केले तेव्हा शरद पवार व्यासपीठावर उपस्थित होते. त्याबद्दल उदयनराजे यांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा शरद पवार यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. शरद पवार बोलल्यानंतर उद्धव ठाकरे यांना बोलावेच लागते. तसेच उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात पूर्वीपासून किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत, हे आपल्याला माहिती आहे, अशी खोचक टिप्पणीही फडणवीस यांनी केली.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या फेऱ्यात सापडलेल्या व्यक्तींना भाजपमध्ये का घेता?

या मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना भाजपमध्ये नव्याने आलेल्या नेत्यांविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु असलेल्या व्यक्तींना भाजपमध्ये कसा प्रवेश दिला जातो, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही सरसकट सर्व कलंकित नेत्यांना पक्षात प्रवेश देत नाही. अशा काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे, ही बाब मी कबूल करतो. निवडणुकीच्या राजकारणासाठी अशा काही तडजोडी कराव्या लागतात. पण संबंधित नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर त्यांची चौकशी कुठेही थांबलेली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here