सोलापूर : कर्नाटक सरकारने जत तालुक्यातील काही गावांवर दावा सांगितल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद धुमसू लागला आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर जोरदार हल्ले-प्रतिहल्ले केले जात आहे. मात्र महाराष्ट्रातील एक तालुका असाही आहे, जिथे महाराष्ट्र सरकारकडूनच कन्नड माध्यमातील शाळा चालवल्या जातात. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुतांश गावं ही कन्नड भाषिक आहेत. ही गावे महाराष्ट्र राज्यात असल्याने तेथील सर्व शासकीय कामकाज हे मराठी भाषेत केले जाते. परंतु बहुसंख्य लोकांची भाषा कन्नड असल्याने अनेक गावांत कन्नड भाषेत शिक्षण दिले जाते. कन्नड माध्यमातील या शाळा महाराष्ट्र शासनाच्या असून सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत चालवल्या जातात.

कन्नड माध्यमांच्या शाळेत मराठी भाषादेखील शिकवत असल्याची माहिती येथील शिक्षकांनी दिली. सीमावर्ती भाग असल्याने शिक्षण घेतलेला विद्यार्थी हा कर्नाटक किंवा महाराष्ट्र राज्यात दोन्ही ठिकाणी नोकरी करू शकतो, असंही येथील शिक्षकांनी सांगितले.

मराठी माणसाचा अभिमन्यू करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न दिसतो : नीलम गोऱ्हे यांचा आरोप

१५ ते २० गावांत कन्नड शाळा

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुतांश गावांतील नागरिकांची बोलीभाषा ही कन्नड आहे. त्यामुळे या गावांत कन्नड भाषेचा भरपूर प्रसार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेने देखील कन्नड माध्यमातून प्राथमिक शाळा सुरू केल्या आहेत. जवळपास १५ ते २० गावांत कन्नड माध्यमाच्या शाळा आहेत. या भागातून कर्नाटक राज्य जवळ असल्याने पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थी हे कर्नाटकातील झळकी गावात महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जातात. तसेच त्यांना मराठीमधून शिक्षण घ्यावयाचे असल्यास ते सोलापुरातील मुख्यालयाच्या ठिकाणी येतात, अशी माहिती शिक्षकांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here