नेहल शेखर मेश्राम (वय १०) असे या मुलाचे नाव आाहे. गुलमोहरनगर या नाल्यावर असलेल्या सीमेंटच्या खांबावरून तो नाल्याच्या दुसऱ्या भागाला जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. खांबावरून जात असताना त्याचा तोल गेला. त्यानंतर तो थेट नाल्यात पडला. नाल्यातील पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तो नाल्यातून थेट वाहत केला. दुपारी दीड ते दोन वाजताची ही घटना आहे. अग्निशमन विभागाला दुपारी २.१० वाजता ही माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच अग्निशमन दलाचे कळमना,सक्करदरा आणि गंजीपेठ या स्थानकातील पथक घटनास्थळी हजर झाले. सोबत बोटही घेण्यात आली. तथापि, बोटचे काम पडले नाही. या नाल्यात अनेक ठिकाणी दुरूस्तीचे काम सुरू असल्याने नाल्यात काही ठिकाणी पारे आहेत. त्यातील एखादी भागात तो मुलगा अडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गुलमोहरनगरकडून भरतवाडयापर्यतच्या नाल्यापर्यत रविवारी सायंकाळपर्यंत शोधकार्य करण्यात आले.
गेल्या दोन दिवसात शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे या नाल्याचा प्रवाह वाढला आहे. हा नाला पुढे नाग नदीला मिळतो. त्यामुळे किमान नाल्यातच मुलगा सापडू शकतो. सध्या शाळा बंद असल्याने मुले अनेक ठिकाणी खेळत असतात. नाल्यावर वीजेचा सीमेंटचा खांब गुलमोहरनगर जवळ टाकण्यात आला आहे. या नाल्यावरून दुसऱ्या भागाकडे जाणे अत्यंत जोखमीचे काम आहे. असे असतानाही हा मुलगा खांबावरून जात होता. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अग्निशमन अधिकारी पी.बी. चंदनखेडे यांच्यासह अनिल गोएल, अनिल बरडे, सुनील गोरडे यांच्यासह पथक घटनास्थळी मदतकार्यात जुंपली होती.
दरम्यान, पावसामुळे शहरातील अनेक नाले धोकादायक बनलेले आहेत. काही नाले तर थेट वस्त्यांमधून वाहतात. या नाल्यांवर अनेक ठिकाणी केवळ लाकडांचे पराटे टाकलेले आहेत. तर, काही ठिकाणी तात्पुरती मलमपट्टी स्लॅब टाकण्यात आले. अनेक ठिकाणी तर नागरिकांकडूनच नाल्यावर पाटया टाकण्यात आल्या आहेत. अशा नाल्याच्या काठावर अनेक कुटुंब वास्तवास आहेत. या कुटुंबांमध्ये लहान मुले असल्याने, पावसाळयात असे नाले धोकादायक बनलेले आहेत.
ताजनगरचा मुलगा अद्यापही सापडला नाही
वर्षभरापुर्वी यशोधरानगर येथील ताजनगर परिसरातील एक मुलगा घराजवळील नाल्यात पडला. तो वाहून गेला. आठवडाभर अग्निशमन पथकाकडून या मुलाची शोधाशोध करण्यात आली. मात्र, अद्यापही हा मुलगा सापडला नाही.
कस्तुरबानगरात झोपडीच नाल्यात कोसळली
दोन वर्षापूर्वी जरीपटका भागातील कस्तुरबानगर परिसरात नाल्यावर उभारण्यात आलेली झोपडीच नाल्यात कोसळली होती. या झोपडीचा अर्धा भाग नाल्यावर बांधण्यात आला होता. या घटनेवेळी आजी व नातू दोघेही नाल्यात पडले. मुलाचा आजोबाही पडला होता. मात्र, तो बचावला. तर, आजी व नातूचे एक दिवसानंतर दूरवर सापडले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times