पंजाब नॅशनल बँकेला युटीआ एएमसी (UTI AMC) मधील संपूर्ण १५.२२ टक्के भागभांडवल विकण्यास मान्यता मिळाली आहे. पीएनबीला या संदर्भात दीपम (DIPAM) म्हणजेच सरकारच्या निर्गुंतवणूक विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. सध्याच्या मूल्यांकनानुसार युटीआय या मालमत्ता व्यवस्थापन कंपनीमध्ये बँकेची १,३०० कोटींची भागीदारी आहे.
या बातमीनंतर ब्रोकरेज फर्म शेअरखानने या बँकेचे रेटिंग अपग्रेड केले आहे आणि खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी त्यांनी होल्ड करण्याचा सल्ला दिला होता. ब्रोकरेजने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, मालमत्तेवरील परताव्यात सुधारणा झाल्यामुळे आगामी काळात शेअर्समध्ये गुंतवणुकीतून चांगला परतावा अपेक्षित आहेत.
पीएनबीमध्ये ७ टक्क्यांहून अधिक तेजी
आज या शेअरमध्ये बंपर तेजी पाहायला मिळत आहे. पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स ७ टक्क्यांहून अधिक वधारले असून ते ५४.५० रुपयांवर व्यवहार करत आहेत, जो त्यांचा ५२ आठवड्यांचा नवीन उच्चांक असून कंपनीचे मार्केट कॅप ६० हजार कोटींच्या जवळपास आहे. या शेअर्समध्ये एका आठवड्यात १९ टक्के, एका महिन्यात २५ टक्के, तीन महिन्यांत ५५ टक्के आणि यावर्षी आतापर्यंत ४६ टक्के वाढ झाली आहे. आज युटीआय ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या शेअर्समध्येही चांगली तेजी दिसून येत आहे. कंपनीच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांहून अधिक उसळी पाहायला मिळाली.
गुंतवणुकीनंतर लक्ष्य किंमत जाणून घ्या
ब्रोकरेजने शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी होल्ड टू बाय अपग्रेड केले आहे. लक्ष्य किंमत ६४ रुपये ठेवण्यात आली आहे. ब्रोकरेजने सांगितले की, आर्थिक वर्ष २०२२ मध्ये मालमत्तेवरील परतावा ०.३ टक्के होता, जो या आर्थिक वर्षात ०.४ टक्के आणि पुढील आर्थिक वर्षात ०.७ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. इक्विटीवरील परतावा ३.७ टक्के होता, जो या आर्थिक वर्षात ६.१ टक्के आणि पुढील आर्थिक वर्षात ९.७ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.