नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मुलाचा भावी खासदार असा उल्लेख करत बॅनर झळकू लागल्याने आता नाशिकमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. अविष्कार भुसे हे दादा भुसे यांचे चिरंजीव असून त्यांच्याकडे शिंदे गटाकडून युवा सेनेची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीच्या आधीही त्यांच्याकडे युवासेनेचे पद होते.

काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाची भाजप आणि राष्ट्रवादीकडून चाचपणी करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता धुळे लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून अविष्कार भुसे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात आहे की काय, असा प्रश्न अविष्कार यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनर्सच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे. अविष्कार भुसे यांच्या वाढदिवसाचे पोस्टर नाशिक, मालेगाव आणि धुळ्यात लागले आहेत. त्या पोस्टरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी भावी खासदार असा देखील उल्लेख केला आहे. सध्या या मतदारसंघातून भाजपचे डॉ. सुभाष भामरे हे खासदार आहे. अविष्कार भुसे यांनीही निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचा भाजपसोबत संघर्ष होण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुखावर हल्ला, पक्षाचेच जिल्हाप्रमुख संशयाच्या भोवऱ्यात

धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील तीन आणि धुळे जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये मालेगावचाही समावेश होत असल्याने लोकसभा निवडणुकीच्या वेळी धुळ्याबरोबरच मालेगावला देखील अधिक महत्व दिले जाते. धुळे लोकसभा मतदारसंघाचे राजकीय गणित मालेगावला सोबत घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे आता मालेगावबाह्य विधानसभा मतदारसंघातून निवडून येणारे आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या दादा भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, अविष्कार भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या बॅनरवर ठळकपणे भावी खासदार असा उल्लेख करण्यात आल्याने आगामी काळात अविष्कार यांच्याकडून खरंच या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत मोर्चेबांधणी केली जाते का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here