म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘आयआयटी’मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देताना यंदा त्यांना बारावीच्या परीक्षेत किती गुण मिळाले आहेत, याचा विचार केला जाणार नाही. करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे देशातील काही शिक्षण मंडळांच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. तर काही मंडळांनी सरासरी गुण दिले आहेत. यामुळे देशातील सर्व ‘आयआयटी’च्या संयुक्त परीक्षा मंडळाने यंदा प्रवेशासाठी बारावीचे गुण विचारात न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘आयआयटी’मधील प्रवेशांसाठी जेईई मेन, जेईई अॅडव्हान्स्ड या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. उत्तीर्ण झालेले दीड लाख विद्यार्थी अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरतात. ही परीक्षा देणारे विद्यार्थी देशातील सर्व आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेश घेण्यास पात्र ठरतात. असे असले तरी या विद्यार्थ्यांना मिळालेले बारावीचे गुण त्यासाठी ग्राह्य धरले जातात. ‘आयआयटी’मध्ये प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्डच्या गुणांबरोबरच बारावीत ७५ टक्के किंवा टॉप २० पर्सेंटाइल गुण आवश्यक असतात. यावर्षी ही अट शिथिल करण्यात आली आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. मात्र विद्यार्थी बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. तसेच जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षाही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याबाबत नुकतीच देशातील मुंबईसह सर्व ‘आयआयटी’च्या संचालकांची बैठक झाली. त्यानंतर संयुक्त परीक्षा मंडळाने याबाबतचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा दिला. याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनीही ट्वीटद्वारे माहिती प्रसिद्ध केली आहे.

…यामुळेच निर्णय

सर्वसाधारणपणे ‘आयआयटी’ प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त बारावीत किमान ७५ टक्के गुण किंवा टॉप २० पर्सेंटाइल अनिवार्य असते. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीत किमान ६५ टक्के गुण आणि टॉप २० पर्सेंटाइल अनिवार्य आहे. मात्र यावर्षी करोनामुळे सीबीएसई, आयसीएसई बोर्डांनी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. दोन्ही शिक्षण मंडळांनी निकाल लावताना अन्य परीक्षांच्या गुणांच्या आधारे मूल्यांकनाच्या विशिष्ट पद्धतींचा अवलंब केला आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणांवर याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे संयुक्त परीक्षा मंडळाने बारावी गुण ग्राह्य न धरण्याचा निर्णय घेतला.

जेईई मेन लांबणीवर

करोनाच्या गंभीर स्थितीमुळे जेईई मेन परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. नव्या वेळापत्रकानुसार जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत तर जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here