राजस्थानातील सत्तानाट्यात आता फोन टॅपिंग प्रकरणाचे वळण आले आहे. यांचे अन्यायाविरुद्ध बंड वगैरे प्रकरण झूठ होते याचा पर्दाफाश मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला आहे. त्यांनी पायलट व नेत्यांमधील फोन संभाषण समोर आणले. त्यामुळं कोंडीत सापडलेल्या भाजपनं आता बेकायदा फोन टॅपिंगचा मुद्दा पुढं आणून काँग्रेस नेत्यांच्या चौकशीची तयारी सुरू केली आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर तोफ डागली आहे.
‘राजकीय पुढाऱ्यांचेच काय, तर कोणाचेही खासगी संभाषण चोरून ऐकणे हा गुन्हाच आहे. हा एखाद्याच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घालाच आहे. त्यामुळे केंद्रीय गृहखाते याबाबत चौकशी करणार असेल तर त्यात चुकीचे काही नाही. प्रश्न इतकाच आहे की, गेहलोत सरकारला हे का करावे लागले हा आहे,’ अशी विचारणा शिवसेनेनं केली आहे.
‘राजस्थानात बहुमताचे सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू होत्या व त्यासाठी आमदारांची खरेदी चढ्या भावाने सुरू होती. सचिन पायलट यांच्या बंडामागे नीतिमत्ता कमी व पैशांची फूस जास्त होती. हा जनता व लोकशाहीशी द्रोह आहे. गेहलोत सरकारने पुराव्याच्या आधारे भाजपचे एक नेते व केंद्रीयमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शेखावत यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे व आरोप आहेत आणि त्याबाबत भाजप बोलायला तयार नाही. फोनवरील संभाषण ऐकणे, पाळत ठेवणे हे जितके बेकायदेशीर आहे, तितकेच सरकार पाडण्यासाठी आमदारांना विकत घेणेही गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. राजस्थानात राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी करणाऱ्यांनी अद्यापि त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा का घेतला नाही?,’ असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
‘महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी जे सत्ता स्थापनेचे रोमांचक नाट्य घडले, त्यात विरोधकांच्या फोन टॅपिंगची एक छटा होतीच. त्यावर बोलले की, अनेकांना मिरच्या झोंबतात, पण या मिरच्यांना बाजारात आज भाव उरलेला नाही. अशा मिरच्यांत तिखटपणा कमी व तडतडणे जास्त. तसे तडतडणे भाजपकडून सुरू आहे. पायलट यांचे बंड फसल्याने भाजपचे कारस्थान उघड झाले. हे बंड फसफसले नसते तर त्या आनंदोत्सवात सगळे गुन्हे पचवले गेले असते,’ असा आरोपही शिवसेनेनं केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times