वाचा:
राजस्थानातील सत्तानाट्यात सध्या ‘फोन टॅपिंग’चे नवेच जोडप्रकरण पुढं आलं आहे. काँग्रेसनं सचिन पायलट व भाजप नेत्यांच्या संभाषणाच्या ऑडिओ टेप्स समोर आणल्या आहेत. भाजपनं हे सगळं बनावट असल्याचं म्हणत सर्व आरोप फेटाळले आहेत. तसंच, अशोक गेहलोत सरकारवर बेकायदा फोन टॅपिंगचा आरोप केला आहे व केंद्रीय गृहमंत्रालयाकडून फोन टॅपिंगची चौकशी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे.
‘फोन टॅपिंग प्रकरण साधे नाही व ते फक्त राजस्थानातच होत आहे अशातला प्रकार नाही. महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी जे सत्ता स्थापनेचे रोमांचक नाट्य घडले, त्यात विरोधकांच्या फोन टॅपिंगची एक छटा होतीच. फोन टॅपिंग हा गुन्हा व व्यक्तिगत स्वातंत्र्यावर आघात आहेच, पण लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार पैशांच्या बळावर पाडणे हा घटनाद्रोह आहे. त्यामुळे कोणता गुन्हा मोठा हे ठरवायला हवे,’ असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.
महाराष्ट्रात जे ‘ठाकरे सरकार’ आहे ते जनतेने निवडून दिलेले नाही. त्यामुळं या सरकारला राज्य करण्याचा अधिकार नाही, असे फडणवीस म्हणतात. पण बहुमताचा आकडा असणे हीच लोकशाही आहे ही घटनात्मक तरतूद तरी मानाल की नाही,’ असा प्रश्नही शिवसेनेनं केला आहे. ‘राजस्थानमधील गेहलोत सरकार तर लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे. तरीही ते पाडण्याचा उद्योग झाला. मध्य प्रदेशात लोकांनी निवडून दिलेले सरकार होते. तेही पाडले,’ याची आठवणही शिवसेनेनं करून दिली आहे.
असा विडाच काही लोकांनी उचलला आहे!
‘राजस्थानातील फोन टॅपिंगने अनेकांचे पितळ उघडे झाले, पण काँगेस पुढाऱ्यांचे आपापसातील संभाषण कोणी चोरून ऐकले व ते राहुल गांधींपर्यंत पोहोचवले तरी बरेच गौप्यस्फोट होतील. राहुल गांधी यांना धड कामच करू द्यायचे नाही, असा विडाच काही लोकांनी उचलला आहे. याचा फटका समस्त विरोधी पक्षाला बसतो,’ अशी खंतही शिवसेनेनं या निमित्तानं व्यक्त केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times