Agriculture News : शेती क्षेत्रात सातत्यानं नव नवीन प्रयोग केले जात आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीतून भरघोस उत्पादन घेतलं जात आहे. उच्चशिक्षीत युवक देखील शेती क्षेत्राकडं येताना दिसतायेत. आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी (Farmers) कसा होईल याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका मॅकेनिकल इंजिनियरिंगचं ( Mechanical Engineer) शिक्षण घेतलेल्या तरुणानं शेतकऱ्यांसाठी काम करायचं ठरवलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यातील बेंबळे गावच्या अविनाश दिलीपराव भोसले (Avinash Diliparao Bhosale) यांनी दिलीषा अॅग्रो’ प्रायव्हेट लि. कंपनीची (Dilisha Agro) स्थापना केली आहे. या माध्यमातून ते शेतकऱ्यांकडून मका खरेदी करतात. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मकेची खरेदी होत असल्यानं शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.

अविनाश भोसले आणि त्यांची बहिण अश्विनी भोसले यांनी  दिलीषा अॅग्रोची स्थापना करुन शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन दिला आहे. मनिषा दिलीपराव भोसले या देखील कंपनीच्या संचालक आहेत. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते स्वीट कॉर्न मकेची खरेदी करतात. जागेवर शेतकऱ्यांना किलोला 14 रुपयांचा दर दिला जात आहे. त्यामुळं विनाखर्च शेतकऱ्यांना जागेवरच चांगला दर मिळत आहे. कंपनीची गाडी शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये जाते, शेतकरी फक्त कणसे मोडून गाडीत भरून देतात. त्यानंतर शेतकऱ्यांसमोरच काटा केला जातो. जेवढे वजन भरेल तेवढ्याचं रोख पेमेंट शेतकऱ्यांना दिले जाते. तसेच कंपनीकडून स्वीट कॉर्नचे बियाणे देखील शेतकऱ्यांना दिले जाते.

शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय? 

याबाबत एबीपी माझाने दिलीषा अॅग्रोला मका दिलेल्या काही शेतकऱ्यांशी संपर्क साधला. त्यांचं नेमकं मत काय हे जाणून घेतलं. यावेळी करामाळा तालुक्यातील कंदर गावचे शेतकरी समाधान भगत म्हणाले की, मला या पिकापासून चांगला फायदा झाला. माझ्या मकेला दिलीषा अॅग्रोनं 15.50 रुपयांचा दर दिला. मी 50 गुंठे क्षेत्रावर मका केली होती. यातून मला 15 दिवसात 1 लाख 63 हजार रुपयांचे उत्तन्न मिळाल्याची माहिती भगत यांनी दिली. यासाठी खर्च 35 हजार रुपयांचा आला. तर राहिलेले मकवान मी चाऱ्यासाठी विकले त्याचे मला 60 हजार रुपये मिळाल्याचे भगत म्हणाले.

News Reels


 
माढा तालुक्यातील अकोले खुर्दचे शेतकरी भारत कुबेर म्हणाले की, अर्धा एकर क्षेत्रावर मका केली होती. या मकेला  किलोला 14 रुपयांचा दर मिळाला. 75 दिवसात 50 हजार रुपयांचे उत्तन्न मिळालं.  
अर्धा एकरमध्ये 4 टन मका निघाली. यासाठी खर्च 15 ते 16 हजार रुपयांचा आला. राहिलेल्या मकवानाचा  मुरघास केला त्यातून मला 50 हजार रुपये मिळाल्याची माहिती कुबेर यांनी दिली. तर अर्धा एकर मकेतून 75 दिवसात मला 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती माळशिरस तालुक्यातील उंबरे वेळापूरचे शेतकरी चंद्रकांत गंभीरे यांनी दिली.

आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करायचा हा उद्देश

याबाबत एबीपी माझाने दिलीषा अॅग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक अविनाश भोसले यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले की, माझं पुण्यातून मॅकेनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण झालं आहे. पण नोकरी न करता शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचे मी ठरवले होते. आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी करायचा हा उद्देश असल्याचे अविनाश भोसले यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. माझे कार्यक्षेत्र हे संपूर्णपणे सोलापूर जिल्हा तसेच इंदापूर तालुका आणि बारामती तालुका इथपर्यंत आहे. सध्या सोलापूर जिल्ह्याती, माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, मोहोळ या ठिकाणाहून स्वीट कॉर्न मक्याची खरेदी करत असल्याचे भोसले म्हणाले.

शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिकचा दर

शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळं शेतकरी मका पिकाची लागवड करत नव्हते. पण त्यांना जर चांगली बाजारपेठ मिळाली तर शेतकरी हे पीक घेऊ शकतात असे भोसले म्हणाले. मी शेतकऱ्यांकडून रोख स्वरूपात खरेदी केलेला माल पुण्यामधील फ्रोजन युनिटकडे पाठवतो. त्यांच्यासोबत माझ्या कंपनीने दिलीषा अॅग्रोने करार केला आहे. त्याठिकाणी स्वीट कॉर्न मक्यावर प्रक्रिया केली जाते असे भोसले म्हणाले. शेतकऱ्यांना बाजार भावापेक्षा जास्त दर जागेवर देत असल्याचे भोसले म्हणाले.

पुढच्या काळात दररोज 20 टन माल खरेदीचं उद्दीष्ट

लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आल्या. याच काळात मी आणि माझी बहिण अश्विनी यांनी मार्च 2020 मध्ये टेंभूर्णीतील बेंबळे या गावी आलो होतो. यावेळी शेतकऱ्यांसमोर असणाऱ्या अडचणी आमच्या लक्षात आल्या. त्यानर आम्ही चर्चा करुन काहीतरी करण्याचे ठरवले. तयानंतर आम्ही 30 जून 2020 रोजी दिलीषा अॅग्रो ली. स्थापना केली. आमच्या कंपनीचा उद्देश हा शेतकऱ्यांचा माल योग्य दरात विकत घेणे, त्यावर प्रक्रिया करुन एस्पोर्ट करणे असल्याचे भोसलेंनी सांगितले. पुढच्या काळात दररोज 20 टन शेतकऱ्यांकडून माल खरेदी करुन त्यावर प्रोसेसिंग करून फ्रोजन स्वीटकॉर्न चे 1,2,5 किलोचे पॅकेट्स एक्सपोर्ट करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट असल्याचे अविनाश भोसले म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Success Story : गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला तब्बल दीड कोटींचा नफा, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here