मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळवलं. हे सत्तांतर होत असताना अनेक बंडखोर आमदारांना मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र सुरुवातीच्या काळात मोजक्याच नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आणि लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं जाहीर करण्यात आलं. मात्र राजकीय उलथापालथीनंतर सत्ताबदल होऊन चार महिने उलटल्यानंतरही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार संजय शिरसाट, प्रहारचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्यांनी विविध व्यासपीठांवरून आपली नाराजी व्यक्त केली. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत असणाऱ्या या नेत्यांच्या पोटात गोळा आणणारी राजकीय भविष्यवाणी वर्तवली आहे.

‘सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे मंत्रिमंडळ विस्तारासाठी वारंवार नवनवीन मुहूर्त सांगितले जात आहेत. मात्र हे सरकार पडेल तरी विस्तार होणार नाही,’ असा अंदाज आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. तसंच विस्तार होत नाही त्यामुळेच विस्ताराच्या विमानाने बंडखोर आमदार फिरत आहेत, असा टोलाही आदित्य यांनी लगावला आहे.

नरेंद्र मोदींच्या होम ग्राऊंडवर भाजपची परीक्षा, एका मुख्यमंत्रिपदासाठी तीन सीएम प्रचाराच्या रिंगणात

बोरीवली येथे महायूथ फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित रोजगार मेळाव्याला आज आदित्य ठाकरे उपस्थित होते. तरुणांनी सकारात्मक विचार घेऊन प्रत्येक क्षेत्रात काम करावं, यश तुमच्याच हातात आहे, असं म्हणत यावेळी आदित्य ठाकरेंनी तरुणांना प्रोत्साहन दिलं. तसंच महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला चालले आहेत, बेरोजगारी वाढत चालली आहे. या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असताना, घटनाबाह्य मुख्यमंत्री सर्व आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी फिरत आहेत. आता गुवाहाटीला गेलेत, तिथून आणखी कुठे जाणार? असा सवाल करत महाराष्ट्रासाठी काम करायचं त्यांच्या कधीच मनात नव्हतं असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

‘राज्यपाल हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवली पाहिजे’

राज्य सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही लक्ष्य केलं आहे. ‘महाराष्ट्राचे राज्यपाल हे राज्यपाल नसून राजकीय नेते आहेत. त्यांनी आम्हाला सत्तेतून बाहेर काढून टाकलं, विधानसभा अध्यक्ष आमच्या काळात नेमला नाही. सरकार बदलल्यानंतर लगेच अध्यक्ष नेमला गेला. तसंच १२ आमदारांचा देखील प्रश्न प्रलंबित ठेवला. त्यामुळे हे राजकीय राज्यपाल हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवली पाहिजे,’ असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here