वाऱ्याचा वेग वाढला किंवा दहा-बारा पक्षी तारेवर बसले तरी या तारा एकमेकांना घासून त्यांच्या घर्षणाने ठिणग्या पडतात. असाच प्रकार नुकताच घडला आणि तारांच्या खाली असलेल्या उसाने पेट घेतला. त्यामुळे आग भडकत पुढे गेली व या आगीमध्ये सोमनाथ अटकळे यांचा पाच एकर ऊस जळून खाक झाला. ऊसाला आग लागलेली दिसताच १० ते १५ तरुणांनी चोहोबाजूंनी आग विझविण्याचा प्रयत्न केला व आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत होत्याचं नव्हतं झालं होतं.
सदरचा ऊस हा पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या पुरस्काराच्या यादीत होता. या ऊसाची विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना यांच्याकडे गळीतासाठी नोंदणी केलेली आहे. झालेलं नुकसान तातडीने शासनाकडून आम्हाला मिळावे अशी मागणी अटकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान किमान आता तरी वीज वितरण कंपनीने अशा धोकादायक बनलेल्या वीज वाहिन्यांची दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी, अशी मागणी या घटनेनंतर शेतकरी करू लागले आहेत.