शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ज्या चिखलीत सभा घेतली, तिथले आमदार-खासदार त्यांना सोडून गेले होते, पण ठाकरेंना त्याचा काडीमात्र फरक पडला नाही. उलट अधिक त्वेषाने ते भाजप शिंदे गटावर तुटून पडले. एकनाथ शिंदे यांचं भविष्य, भावना गवळींची राखी आणि देवेंद्र फडणवीस यांची लाज काढत उद्धव ठाकरेंनी घणाघाती भाषण केलं. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं तर शिवसेना फुटीवरुन बंडखोर आमदार-खासदारांना इशारेही दिले.

- बुलडाणा जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला
- प्रतापराव जाधव, संजय रायमुलकर, संजय गायकवाड यांचा बालेकिल्ला
- पण तिन्ही नेते शिंदे गटात गेल्याने सेनेचा गड ढासळल्याची चर्चा
- पण असं असलं तरी ठाकरेंच्या सभेत कुठेच तसं चित्र जाणवलं नाही
- आमदार-खासदार शिंदेंसोबत पण निष्ठावंत शिवसैनिक ठाकरेंसोबत असल्याचं चित्र
- ठाकरेंच्या सभेला हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीने हेच चित्र अधोरेखित
बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना शिवसेनेने भरुनभरुन दिलं. त्यांना तीन वेळा खासदार केलं. कुठल्याही अडअडचणीच्या काळात ठाकरे कुटुंब जाधवांच्या मागे खंबीरपणे उभा राहिलं, पण शिवसेनेत उभी फूट पडली आणि जाधवांनी पुढचा मागचा विचार न करता शिंदेंना साथ द्यायचा निर्णय घेतला. तत्पूर्वी आमदार संजय रायमुलकर, संजय गायकवाड यांनीही ठाकरेंवर आरोप करत त्यांची साथ सोडली आणि शिंदेंना पाठिंबा देण्यासाठी गुवाहाटी गाठली..
- प्रतापराव जाधव, संजय गायकवाड आणि संजय रायमुलकर बुलडाण्याचे त्रिदेव
- पण त्यांना घरी बसवून दुसऱ्या फळीतील शिवसैनिकांना मैदानात उतरविण्याचा ठाकरेंचा निश्चय
- गेले ते गद्दार, राहिलेले निष्ठावंत; गद्दारांना गाडूया, पुन्हा नव्या सैनिकाला निवडून देऊन मशाली पेटवूया, ठाकरेंची घोषणा
आमदार खासदार नसतानाही, ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गर्दी केली. शिवसेनेच्या बुलढाण्यातील त्रिदेवांनी ठाकरेंची साथ सोडल्यावर बुलढाण्याची सभा कशी होणार? मंचावर कोण असणार? शिवसैनिकांची उपस्थिती असणार का? असे प्रश्न होते.. पण ठाकरेंनी या सभेत सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. हजारो शिवसैनिकांची उपस्थितीच सगळं काही सांगून गेली. आमदार खासदार नसतानाही, ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. मुंबईबाहेरची पहिलीच सभा उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात घेतल्यामुळे खासदार जाधव, आमदार संजय रायमुलकर आणि संजय गायकवाड यांच्यापुढील अडचणी नक्कीच वाढल्या आहेत, अशी जिल्ह्यात चर्चा आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.