राज ठाकरे हे मुंबई आयोजित मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. राज्यपाल कोश्यांरींच्या वक्तव्यावर बोलताना ठाकरे पुढे म्हणाले की, ते काय बोलून गेले महिन्याभरापूर्वी… म्हणे इथले जर गुजराती आणि मारवाडी जर परत गेले, तर इथे काय होईल. कोश्यारीजी, पहिल्यांदा त्या गुजराती आणि मारवाडी समाजाला विचारा की, तुम्ही तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आलात?. तुम्ही उद्योपती आहात ना, तुम्ही व्यापारी आहात ना… मग तुमच्या राज्यात का नाही व्यापार केलात?, का नाही उद्योग थाटलेत? याचं कारण असं की उद्योगधंदे थाटण्यासाठी आणि व्यापर करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रासारखी सुपिक जमीन नव्हती.’
महाराष्ट्राचा गौरव करताना राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा… अहो, महाराष्ट्र मोठाच होता हो. मोठाच आहे. हा जेव्हा देश नव्हता तेव्हा या देशाला, या भागाला हिंद प्रांत म्हणत. पर्शिया म्हणजेच नंतरचा इराण, ते लोक या भागाला हिंद प्रांत म्हणत. या हिंद प्रांतावर आजपर्यंत आक्रमणं झाली. त्यात मोगल आले, ब्रिटिश आले, पोर्तुगीज आले. मोगल तर किती वर्षे होते, ब्रिटिश तर किती वर्षे होते. पण या हिंद प्रांतावर जर खऱ्या अर्थाने कोणी सव्वाशे वर्षे राज्य केलं असेल तर ते आमच्या मराठेशाहीने केलं. महाराष्ट्र समृद्ध होताच ओ. महाराष्ट्र काय आहे हे आम्हाला कोश्यारींकडून नाही ऐकायचे आहे.’
गुजराती, मारवाडी महाराष्ट्र सोडून परत जातील का?- राज ठाकरे
ठाकरे पुढे म्हणाले, ‘… आणि आज जर आपण त्याच गुजराती आणि मारवाडी समाजाला जर सांगितलं की बाबांनो ठीक आहे जा परत, आणि आपापल्या राज्यामध्ये धंदा करा, व्यवसाय करा. ते जातील का? कारण हे जे सभोवतालचं जे वातावरण आहे ना, कारण काही लोकं खराब करत आहेत, केलंही आहे, पण जे सभोवतालचं वातावरण आहे, उद्योगधंद्यासाठीचं जे वातावरण आहे, आजही परदेशातील कोणताही प्रकल्प त्यांना आणायचा असेल तर तो पहिला प्रेफरन्स हा महाराष्ट्र असतो. म्हणून आपण म्हणतो ना की इकडचा प्रकल्प तिकडे गेला. कारण तो इथे आलेला असतो. याचं कारण त्यांची इच्छा महाराष्ट्रात उद्योगधंदा थाटायचा असतो.’