या परिषदेचे उद्घाटन भारतीय संरक्षण मंत्रालयास प्रधान सल्लागार असलेले व लष्करात ४३ वर्षे सेवा देऊन निवृत्त झालेले लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी भारतापुढील भावी दहशतवादी आव्हानांची माहिती दिली. दहशतवाद आता नव्या स्वरूपात समोर येणार असून सायबरविश्व, अंतराळविश्व आणि माहितीचे विश्व अशा तिन्ही क्षेत्रांत मोठे आव्हान उभे करील. ही आव्हाने पेलण्यासाठी सुरक्षा आणि आर्थिकवृद्धी या दोन्ही आघाड्यांवर आपल्याला बाजी मारावी लागेल. त्याचप्रमाणे राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वसमावेशक असली पाहिजे. त्यात आर्थिक धोरणे, पर्यावरण, बुद्धिसंपदा व स्वामित्त्व, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांचा त्यात समावेश असेल’, असे ते म्हणाले.
निवृत्त एअरमार्शल राजेश कुमार यांनी हवाई दलाने दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी क्षमतावृद्धी कशी केली, त्याचे दाखले दिले. हेलिकॉप्टरचा दहशतवाद्यांविरोधातील वापर, तसेच उरीनंतर झालेले सर्जिकल स्ट्राइक व पुलावामा हल्ल्यानंतर झालेला बालाकोट हवाई प्रतिकार हे पाकिस्तानसाठी अनाकलनीय व धडकी भरविणारे ठरले, असे त्यांनी सांगितले.
आयपीएस राकेश अस्थाना यांनी गुप्तवार्ता आदानप्रदानात कसा फरक पडला ते सांगितले. तर, माजी पोलिस महासंचलक डी. शिवानंदन यांनी मुंबई हल्ल्याची सचित्र माहिती दिली व केवळ वर्दीतील हुतात्माच नव्हे, तर १९९३पासून आजवर बॉम्बस्फोटांमध्ये नाहक जीव गमवावा लागलेल्या सर्वच नागरिकांचे स्मरण व्हायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ब्रह्मा रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक प्रा. विजय पागे यांनी या चर्चासत्रांचे प्रास्तविक केले भारतीय नौदलातील निवृत्त व्हाइसअडमिरल अभय कर्वे, भारतीय तटरक्षक दलाचे निवृत्त अतिरिक्त महासंचालक विजय चाफेकर, इस्रायल नौदलाचे निवृत्त व्हाइसअडमिरल डेव्हिड बेन-बाशात यांच्यासह विविध मान्यवर चर्चासत्रात सहभागी झाले होते. आमदार आशीष शेलार यांनीही चर्चासत्राच्या प्रारंभी आपले विचार मांडले.