पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत येत आहेत. नुकतंच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करत वाद ओढावून घेतला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांनीही आक्रमक भूमिका घेत राज्यपालांना हटवण्याची मागणी केली. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आपली भूमिका मांडत राज्यपाल कोश्यारी यांचा समाचार घेतला आहे. तसंच राज्यपालांच्या वक्तव्यामागील हेतूंविषयीच शंका उपस्थित केली आहे.
‘कोणीतरी काहीतरी बोलते आणि बेरोजगारीसह शेतकऱ्यांचे वगैरे मुद्दे मागे पडतात आणि इतर विषयांवर चर्चा सुरू होते. आपले राज्यपाल देखील खाजगीत सांगतात की त्यांना त्यांच्या राज्यात परत जायचं आहे. त्यामुळेच आपल्या राज्यात परतण्यासाठी राज्यपालांकडून अशी विधानं केली जात आहेत का? ते मुद्दाम असं बोलत आहेत का, असा प्रश्न पडतो,’ असं अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. भाजपचे टगे महाराजांचा अवमान करतायेत आणि शिंदे गट हात चोळत बसलाय, उद्वेग होणारच : संजय राऊत
दरम्यान, राज्यपालांची नेमणूक जे करतात त्यांनीच समज देण्याची गरज आहे, अशी मागणी करत अजित पवार यांनी केंद्र सरकारला या वादात लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे.
राज्यात सध्या नोकरभरतीचा मुद्दा गाजत आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘याआधी अनेकदा नोकरभरती झाली, मात्र मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी कधी नियुक्तीपत्रे दिली नाहीत. अलीकडच्या काळात अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यामुळे रोष कमी व्हावा यासाठी असं केलं जात असून ही नौटंकी बंद व्हावी,’ अशी टीका अजित पवार यांनी केली आहे. तसंच पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी ज्या अडचणी येतायत त्या बद्दल सांगलीत मला काही लोक भेटले. मी मुंबईत गेल्यावर देवेंद्र फडणवीस यांची याबाबत भेट घेणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीला गेले, त्यांच्यासोबत भाजपचे नेतेही होते, मात्र हा त्यांचा खाजगी प्रश्न असल्याची भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.