Udayanraje Press Conference | सर्व प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष सभा समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतात, त्यांच्या विचारांना आदर्श मानतात. मात्र दुसरीकडे महाराजांच्याबद्दल लेखन, चित्रपट आणि वक्तव्यातून अवहेलना होत असताना कुणाला कसा राग येत नाही. तुमच्या राजकीय पक्षांचा अजेंडा वेगळा असेल मग महाराजांचे नाव का घेता? असा उदगविग्न सवाल देखील भोसले यांनी राजकीय पक्षांना केला.

हायलाइट्स:
- राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना ३ डिसेंबर नंतर भेटणार
- शिवप्रेमी संघटनाची खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
यासंदर्भात देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना ३ डिसेंबर नंतर भेटून याबाबत गाऱ्हाणे मांडणार असल्याचे उदयनराजे यांनी जाहीर केले. शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याबद्दल भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्यातील विविध शिवप्रेमी संघटनाची खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सोमवारी बैठक झाली. त्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, सर्व प्रादेशिक, राष्ट्रीय पक्ष सभा समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतात, त्यांच्या विचारांना आदर्श मानतात. मात्र दुसरीकडे महाराजांच्याबद्दल लेखन, चित्रपट आणि वक्तव्यातून अवहेलना होत असताना कुणाला कसा राग येत नाही. तुमच्या राजकीय पक्षांचा अजेंडा वेगळा असेल मग महाराजांचे नाव का घेता? असा उद्विग्न सवाल देखील भोसले यांनी राजकीय पक्षांना केला. प्रत्येकजण राजकारण करणार असेल, बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई होणार नसेल तर त्यांना महराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही असा पुनरुच्चार केला. महाराजांची अवहेलना होते, त्याची सर्व पक्षप्रमुखांनी आपली स्पष्ट भूमिका मांडण्याचे आवाहन करत, शासनाच्या वतीने महाराजांचा इतिहास अधिकृतपणे अद्यापही मांडण्यात आलेला नाही. तो मांडायला हवा. भाजपचे नाव न घेता राज्यपालांवर कारवाई करणार नसाल तर महराजांचे नाव घेऊ नका, अशा शब्दांत भाजपला भोसले यांनी इशारा दिला. राज्यपालांची पदावरून हकालपट्टी करा अशी मागणी करत, या प्रकरणाची दखल घेतली नाही तर निवडणुकीमध्ये जनता दखल घेईल, असा इशारा भोसले यांनी दिला.
उदयनराजेंना अश्रू अनावर…
प्रमुख पक्ष श्रेष्ठींना महाराजांचे बेगडी प्रेम कशाला हवे, महाराजांचे नाव विमानतळ, रेल्वेस्टेशनला कशाला देता, शिवजयंती, शिवप्रताप दिन साजरा कशाला करता, महाराजांचे पुतळे कशाला उभे करता? असे प्रश्न उपस्थित करताना महाराजांच्या कुटुंबाचा घटक म्हणून मला वेदना होतात. हे दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असे म्हणत उदयनराजे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण: उदयनराजे भोसले
अलीकडच्या काळात शिवाजी महाराजांविषयी विकृत वक्तव्यं केली जात आहेत. चित्रपट आणि विविध माध्यमातून गलिच्छप्रकारे चुकीचं चित्र उभं केलं जात आहे. हे विकृतीकरण थांबले नाही तर उद्या लहान मुलांच्या समोर हाच तोडलेला,मोडलेला इतिहास येईल. त्यांना सत्य परिस्थिती समजणार नाही. हाच खरा इतिहास आहे, असे त्यांना वाटेल, अशी भीती उदयनराजे भोसले यांनी वर्तविली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.