भुजबळ पुढे म्हणाले, ‘ज्यांनी १५० वर्षांपूर्वी महिलांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला त्यांची पूजा करा. कर्मवीर भाऊराव पाटील यांची पूजा करा. आज लाखो लोक शिकून मोठे होत आहेत. अण्णासाहेब कर्वे यांची पूजा करा. देवी सरस्वती कुठून आली? सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? सरस्वती देवीने किती लोकांना शिकवले? सरस्वतींनी जर शिक्षण दिले असे आपण मानतो तर मग महात्मा फुल्यांना हे पाऊल का उचलावे लागले?, फुल्यांच्या अगोदर शिक्षण सर्व समाजाला का मिळाले नाही? ब्राह्मण समाजातील महिलांनाही का मग शिक्षण मिळत नव्हते?, असे एकावर एक सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केले.
या वेळी बोलताना भुजबळ पुढे म्हणाले की, मी एकदा निफाडमध्ये एका शाळेच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तेथे समोरच सरस्वती देवीचा फोटो होता. मात्र मी सरस्वतीची पूजा करत नाही, असे सांगितले. शाळेतील शिक्षकच जर असे असतील तर मग विद्यार्थ्याचे काय? देशातील दिनदलितांचा उद्धार व्हायचा असेल तर त्यासाठी शिक्षण हेच एकमेव प्रभावी शस्त्र आहे. बाकी ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्या जात नाहीत.
भुजबळ पुढे म्हणाले की, आपण ब्राह्मणाचा विरोध करत नाही. महात्मा फुले ब्राह्मणांविरोधात नव्हते, तर ते ब्राह्मणवादाविरोधात होते. अनेक ब्राह्मणांनी फुले यांना मदत केली होती. आज महाराष्ट्रात महापुरूषांची बदनामी केली जात असल्याचे दिसत आहे. रामदेवबाबांसारखे बाबा सार्वजनिक ठिकाणी महिलांबाबत विधाने करतात. हे बोलण्याचे धाडस कुठून येते, असे म्हणत त्यांनई रामदेवबाबांवर टीकास्त्र सोडले.