नवी मुंबई : हिवाळा सुरू झाल्यापासून मुंबईच्या घाऊक बाजारात सर्वच भाज्यांचे दर कमी झाल्याचे चित्र आहे. एरवी कडाडणारे टोमॅटो आणि कांद्याचे दर आता अगदीच आवाक्यात आले असून घाऊक बाजारात आठ ते १० रुपयांत किलोभर टोमॅटो मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोची २० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
मागील महिन्यापर्यंत टोमॅटोचे दर घाऊक बाजारात ४० रुपये किलोपर्यंत स्थिरावले होते. मात्र हे दर आठ ते १० रुपये किलोवर आल्याने शेतकऱ्यांचा वाहतूकखर्च निघत नसल्याचे सांगण्यात आले.