आतापर्यंत वर्सोवा आणि घाटकोपर या दोन्ही ठिकाणांहून पहिली फेरी सकाळी ६.३० वाजता सुरू होत होती. मात्र आता ती पहाटे ५.३० वाजता असेल. तसेच याआधी वर्सोव्याहून अखेरची गाडी ११.१९ला होती. आता ती ११.२०ला असेल, तर घाटकोपरहून अखेरची गाडी आता ११.४४ ऐवजी ११.४५ वाजता सुटेल.
मेट्रो-१ने पहिली फेरी पहाटे ५.३० वाजता सोडण्याचा निर्णय घेतल्याने वर्सोवा ते घाटकोपर आणि घाटकोपर ते वर्सोवा या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी सात फेऱ्या अतिरिक्त झाल्या आहेत. यामुळे प्रत्येक मार्गावर सरासरी १,२०० ते १,४०० अतिरिक्त प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.
मध्यरात्री गाडी सोडा
वर्सोवा आणि घाटकोपरहून मध्यरात्री गाडी सोडावी, जेणेकरून घाटकोपर-ठाणे व अंधेरी-बोरिवली लोकलने प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळेल, अशी मागणी काही प्रवाशांनी ट्वीटद्वारे केली आहे. ‘परंतु मध्यरात्री ते पहाटे या रेल्वेमार्गाची व गाड्यांची विस्तृत देखभाल केली जाते. त्यामुळे मध्यरात्री विलंबाने गाडी सोडल्यास देखभालीचे व पर्यायाने दुसऱ्या दिवशीचे वेळापत्रक बिघडेल’, असे ‘एमएमओपीएल’ने ट्वीटच्या उत्तरात म्हटले आहे.