शिंदे सरकारवर पकड बसवण्याचा प्रयत्न करत असताना प्रत्येक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या गटातून शिंदे गटात प्रवेशाचा धुमधडाका सुरु झाला आणि बघता बघता हजारो शिवसैनिक एकनाथ शिंदेंचा जयजयकार करत शिंदेंच्या गोटात सामील झाले. हे सगळे होत असताना शिंदे आणि फडणवीस यांच्यात खलबतं होऊन खाते वाटपदेखील झाले. इच्छा असणाऱ्यांना इच्छेप्रमाणे खातं मिळालं, तर काही आमदारांना आश्वासन मिळाले. सरकारचे ४ महिने उलटलेत. मात्र आता इनकमींग करुन शिंदे गटात आलेले शिवसैनिक अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
ज्या कारणासाठी आम्ही एकनाथ शिंदेंसोबत आलो तेच इथे घडत असल्याच्या दु:ख, नाराजी पदाधिकारी बोलून दाखवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सातारा जिल्ह्यातच अनेक पदाधिकारी नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हा नेतृत्वावर नाराज असल्याच्या भावना नाव न घेण्याच्या अटीवर अनेक पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्या असून आत्ता ये रे माझ्या मागल्या अशीच अवस्था असल्याचे शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे गटात आणि इथे काहीच फरक नाही. पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडं इथंही दुर्लक्षच केले जात आहे. त्यामुळे शिंदे गटात येऊन पश्चाताप होत असल्याच्या भावना काही जिल्हाप्रमुख आणि शिवसैनिकांनी खाजगीत बोलून दाखवल्या आहेत. आम्ही अस्वस्थ असून आम्हाला ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा यांचा वेळ मिळतो, पालकमंत्री शंभुराज देसाई यांचा. यामुळे आमच्या भागातील कामे सांगायची कोणाला हा प्रश्न आमच्या समोर असून याच काळात पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याची गरज असतानाही त्यांना ताकद दिली जात नाही अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
सत्तेत असूनही पदाधिकाऱ्यांची कामे होत नाहीत. भागांना निधी मिळत नाही अशा तक्रारी आता शिंदे गटाचे पदाधिकारी करत आहेत. यामुळे आता साताऱ्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये उठाव होऊन एकनाथ शिंदे गटाला मोठं भगदाड पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काही दिवसात आम्ही सगळे मिळून निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असल्याच्या भावना पदाधिकारी यांनी खाजगीत बोलून दाखवल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील नेतृत्वाने वेळीच पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास एकनाथ शिंदे गट फुटण्याची आणि शिंदे गटात भूकंप होऊ शकतो. विशेष म्हणजे गट फुटीची सुरुवात शिंदे यांच्याच सातारा जिल्ह्यातून होण्याची दाट शक्यता आहे.