काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनचा मुहूर्त निश्चित केला होता. देशात करोनाचं असताना केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयाबद्दल पवार यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. ‘राम मंदिर बांधल्यानं करोना जाईल असं काही लोकांना वाटत असेल,’ असा टोला त्यांनी हाणला होता. त्यावरून राजकीय वादंगही माजलं होतं. राज्यातील भाजप नेत्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर काल एका मुलाखतीत त्यांनी भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत आपली भूमिका मांडली होती. ‘भूमिपूजनासाठी आमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही, कारण देशात सध्या करोनाची गंभीर स्थिती आहे. अशा परिस्थिती राज्यातच राहणं महत्त्वाचं आहे. राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे,’ असं ते म्हणाले होते.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’नं या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं होतं. हेच वृत्त रीट्वीट करून नीलेश राणे यांनी पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, ‘बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं एमआयएम पक्षाचे नेते ओवेसी बोलताहेत. नंतर पवार साहेबांचं नाव दिसलं. एवढं मात्र खरं की पवार साहेबांचं वय बघून कोण काय बोलत नाही. पण, जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर त्यांचा रागही वाढताना दिसतोय.’
नीलेश राणे हे सातत्यानं वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत असतात. विशेषत: सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य करत असतात. यापूर्वी साखरेच्या प्रश्नावर शरद पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिल्यानंतरही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. पवारांचे नातू व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी नीलेश यांना उत्तर दिल्यानंतर दोघांमध्ये बरेच दिवस ट्विटर युद्ध रंगले होते.
हेही वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times