Friday, January 27, 2023
Home Blog Page 5240

देशात करोना रुग्णसंख्या १४ लाखांवर, ३२ हजारांवर मृत्यू

0

नवी दिल्लीः देशात संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या १४ लाखांवर गेली आहे. कोरोना व्हायरसने देशात आतापर्यंत १४,११,९५४ जणांना संसर्ग झाला आहे, अशी रविवारची ही आकडेवारी आहे. covid19india.org ने ही आकडेवारी दिली. या आकडेवारीनुसार कोरोनाचे देशात ४ लाख ७७ हजार २२८ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर ९, ०१,९५९ जण करोनामु्क्त झाले आहेत. बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनामुळे देशात आतापर्यंत ३२ हजार ३५० नागरिकांचा बळी गेला आहे.

देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात रविवारी करोनामुक्त झालेल्या ६०४४ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत एकूण २,१३,२३८ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील कोरोना रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ५६.७४ टक्के इतके आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ९४३१ नवीन रुग्ण आढळले. तर या काळात २६७ रुग्णांचा मृत्यू झाला.

तामिळनाडूमध्ये रविवारी कोरोनाची ६९८६ नवीन आढळले. यानुसार राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या संख्याही २,१३,७२३ वर पोहोचली आहे. तामिळनाडूमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ३४९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ५३,७०३ कोरोनाचे अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. तर १,५६,५२६ जण करोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

दिल्लीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.९५ टक्के

दिल्लीत आतापर्यंत १,३०,६०६ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. राजधानी दिल्लीत सध्या ११,९०४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १,१४,८७५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. दिल्लीत कोरोनामुळे ३८२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ८७.९५ टक्के आहे, ही दिलासा देणारी बाब आहे.

मध्य प्रदेशात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूची ७१६ नवीन रुग्ण आढळले. यासह मध्य प्रदेशात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही २६,९२६ वर गेली आहे. राज्यात, गेल्या २४ तासांत या आजारामुळे आणखी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा अलिकडच्या काळात सर्वाधिक आहे. यासह राज्यातील कोरोना येथील मृतांची संख्या वाढून ७९९ इतकी झाली आहे.

तेलंगणामध्ये आज कोरोनाचे १,५९३ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्याही वाढून ५४ हजार ५९ इतकी झाली आहे. या करोनामुळे आणखी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील करोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्याही ४६३ इतकी झाली आहे.

आंध्र प्रदेशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाच्या ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना मृत्यू झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ही १ हजारांवर गेलीय. राज्यात एकूण १०४१ जणांना करोनाने बळी घेतला आहे. आंध्र प्रदेशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ७६२७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढून ९६,२९८ इतकी झाली आहे. राज्यात ४६,३०१ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४८,९५६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

राजस्थानच्या सत्तासंघर्षात बसपाने खेळला 'हा' मोठा डाव

0

जयपूरः राजस्थानमधील राजकीय संकटात रोज नवीन ट्विस्ट येत आहे. आता बहुजन समाज पक्षाने (बसपा) रविवारी काढलेल्या व्हिपमुळे राजस्थानमधील गेहलोत सरकार च्या अडचणीत भर पडली आहे. बसपाने राजस्थानमधील आपल्या सहा आमदारांना व्हिप जारी करून गहलोत सरकारविरोधात मतदान करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राजस्थानमधील राजकारणाला आणखी एक नवीन वळण लागलंय.

राजस्थानमध्ये बसपाच्या तिकीटावर सहा आमदार निवडून आलेत. आर. गुधा, लखन सिंह, दीप चंद, जे. एस. आवाना, संदीप कुमार आणि वाजिब अली हे सह जण बसपाचे आमदार आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हे सहा आमदार कॉंग्रेसमध्ये विलीन झाले होते.

राजस्थान विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अविश्वास ठराव किंवा कुठल्याही कारवाईच्या वेळी कॉंग्रेसविरोधात मतदान करण्याचे निर्देश बसपाने सर्व आमदारांना दिले आहेत.

राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाचे सर्व सहा आमदार कॉंग्रेसमध्ये दाखल झाले होते. आमदार राजेंद्र गुधा (उदयपुरवाटी), जोगेंद्रसिंग अवाना (नदाबाई), वजीब अली (नगर भरतपूर), लखनसिंह मीना (करोली), संदीप यादव (तिजारा) आणि दीपचंद खेरिया (किशनगड बास) यांनी भूमिका बदलली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची भेट घेतल्यानंतर या आमदारांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याची घोषणा केली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

या मुस्लिम महिलांनी बनवल्या अयोध्येतील रामलल्लासाठी राख्या

0

मेरठः उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात काही मुस्लिम महिलांनी रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर प्रभू रामचंद्रांसाठी राख्या बनवल्या आहेत. मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या सहकार्यातून या राख्या राम मंदिर ट्रस्टला पाठवण्यात आल्या आहेत. हिंदू-मुस्लिम सामाजिक सौहार्दाचे हा उत्तम आदर्श मुस्लिम राष्ट्रीय मंचाने देशासमोर ठेवला आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंचच्या महिला संयोजिका अॅड. शाहीन परवेज यांची ही कल्पना आहे. रेश्मा, नीलम, शबनम, फरहीन आणि फरजाना यांच्या साथीने आपण या राख्या रामललासाठी बनवल्या आहेत. या राख्या ३ ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी अयोध्येत रामललाच्या हातावर बांधाव्यात असं आवाहन त्यांनी केलंय.

जातीधर्माच्या नावाने सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्यांवर शाहीन परवेज यांनी सडकून टीका केली. भारतात राहणारे मुस्लिम हे मुघल किंवा बाबरचे वंशज नाहीए. तर प्रत्येक भारतीय मुस्लिमाच्या मनात प्रभू श्रीरामचंद्र आहेत. अयोध्येतील राम मंदिर निर्माणात मुस्लिमांचीही मोठी भूमिका आहे. जात, धर्म आणि भेदभावांच्या पलिकडे जाऊन मुस्लिमांनीही अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी सहकार्य केलं आहे, असं त्या म्हणाल्या.

‘प्रभू श्रीराम हे इमाम ए हिंद आहेत’

प्रभू श्रीराम हे ‘इमाम ए हिंद’ आहेत. भारताची ओळख त्यांच्यामुळेच आहे. ५ ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. आपण सुरुवातीपासूनच अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या बाजून आहोत. राम मंदिर निर्माणासाठी राम मंदिर ट्रस्ट आपल्या शुभेच्छा आहेत. तसंच पंतप्रधान मोदी हे भूमिपूजनाच्या सोहळ्याला येणार असल्याने त्यांचेही अभिनंदन, शाहीन परवेज यांनी केलं.

राखीवर ‘जय श्रीराम’ लिहून श्रद्धा व्यक्त

मुस्लिम महिलांनी रामललासाठी बनवलेल्या राख्या या अतिशय मनमोहक आहेत. भगवान श्रीकृष्णांची प्रतिकृती आणि मोरपंखांनी सुशोभित असलेल्या या राख्यांवर मुस्लिम महिलांनी ‘जय श्रीराम’ लिहित आपली श्रद्धाही व्यक्त केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

धक्कादायक! करोनाने नोकरी जाण्याच्या भीतीने कुटुंबाची आत्महत्या

0

नवी दिल्लीः करोनामुळे नागरिकांसमोर जीवनाचे संकट आहे. पण यामुळेच नोकरी जाण्याच्या भीतीने अनेकांच्या मनात घर केलं आहे. कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात असंच काहीतरी घडलं आहे. यामुळे नागरिकांसमोर रोजगाराचे मोठे संकट उभे ठाकले आहे. यातूनच कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली.

करोना कालावधीत नोकरी जाण्याची त्यांना भीती होती. ज्यामुळे त्याने आत्महत्या केली. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या मुलीचा समावेश आहे. अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही, अशी माहिती कर्नाटक पोलिसांनी दिली.

मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट आढळून आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. ही घटना शनिवारी घडलीय. करोना व्हायरस आजारामुळे आपली नोकरी जाण्याची त्यांना भीती वाटत होती. यामुळे त्या व्यक्तीने संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली आहे, असं सांगण्यात येतंय. पोलिसांनी सध्या संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. धारवाडच्या सुबर्बन पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांनी ही माहिती दिली.

गेल्या काही दिवसांत देशातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ४८,६६१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ७०५ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही १४ लाखांवर गेलीय. तर करोनाने देशातील मृतांची संख्या ही ३२ हजारांवर गेलीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पुणेकरांवर पाणीटंचाइचे संकट; 'ही' धरणे फक्त ४० टक्के भरली

0

म. टा. प्रतिनिधी, पुणेः शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणारी चार प्रमुख धरणे ही गेल्या वर्षी २६ आणि २७ जुलै रोजी शंभर टक्के भरून मुठा नदी ही दुथडी भरून वाहत होती. मात्र, यंदा पावसाने ओढ दिल्याने ही धरणे यंदा जेमतेम ४० टक्के भरली असून, चार धरणांमध्ये ९.८४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे २६ आणि २७ जुलै रोजी वरसगाव, पानशेत, खडकवासला आणि टेमघर ही चारही धरणे शंभर टक्के भरली होती. त्यामुळे मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, यंदा परिस्थिती चिंताजनक असून, चार धरणांमध्ये सुमारे ९.८४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये वरसगाव धरणामध्ये ४.०४ टीएमसी, पानशेत धरणात ४.२७ टीएमसी, खडकवासला धरणामध्ये ०.८१ टीएमसी पाणीसाठा आहे. टेमघर धरणात ०.७२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. टक्केवारीनुसार वरसगाव धरण हे सुमारे ३१.५० टक्के, पानशेत धरण सुमारे ४० टक्के, खडकवासला धरण सुमारे ४१ टक्के आणि टेमघर धरण हे सुमारे २० टक्के भरले असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये २.९३ टीएमसी पाणीसाठा आहे. हे प्रमाण सुमारे ३५ टक्के आहे.

पावसाने जुलै महिन्यात दोन आठवडे ओढ दिल्यामुळे धरणातील पाण्याचे नियोजन कोलडमडले आहे. कमी पावसामुळे जुलैचा शेवटचा आठवडा आला तरी सरासरीपर्यंत पाऊस पोहोचलेला नाही. मात्र, जूनमध्ये झालेल्या पावसाने जून आणि जुलै या दोन महिन्यांची सरासरी पावसाने ओलांडली आहे. निसर्ग वादळापाठापोठ आलेला मान्सून पूर्व पाऊस आणि महिनाभर कमी-अधिक पडलेल्या पावसामुळे जून महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. जुलैमध्ये सुरुवातीला चांगला पाऊस झाला. मात्र, त्यानंतर सलग दोन आठवडे पावसाने ओढ दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

पोलिसाच्या कुटुंबावर शोककळा; करोनात आई, बहिणीला गमावले; आज कॉन्स्टेबलचा मृत्यू

0

मुंबईः महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक करोनाग्रस्त राज्य असून त्याचा मोठा फटका पोलीस दलालाही बसला आहे. दलातील कर्मचारी सोहेल शेख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील दोघांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. एकाच पोलिस कुटुंबातील तिघांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लॉकडाऊनमुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण आहे. त्यांना अहोरात्र सेवा बजावावी लागत आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव पोलीस दलात झाल्याचे पाहायला मिळत आहे. वडाळा टी टी पोलिस ठाण्यातील काॅन्स्टेबल सोहेल शेख यांचा ४०दिवसांपूर्वी करोना चाचणीचा अहवाल पाॅझिटीव्ह आला. त्यानंतर शेख यांना सेंट जाॅर्जेस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या कुटुंबियांची देखील चाचणी करण्यात आली. यातील त्यांची ४० वर्षीय बहिण आणि ६३ वर्षाची आई यांच्या चाचणीचा अहवालही पाॅझिटीव्ह आला. त्यामुळे या दोघींनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार दरम्यान प्रकृती अधिकच खालावत गेल्याने जून महिन्यात शेख यांची आई आणि बहिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर शेख यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने त्यांना गुरू नानक रूग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना सुरूवातीला उपचाराला प्रतिसाद मिळाला परंतु नंतर शेख यांचीही तब्येत बिघडत गेली. रविवारी त्याची प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने पोलिस कुटुंबीयांमध्ये चिंता आहे.

वाचाः

गेल्या चार महिन्यात ८ हजार २३२ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यातील ७ हजार ३७१ कॉन्स्टेबल व ८६१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांना करोनामुक्त ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने अनेक सुविधा पोलिसांना पुरवण्यात येत आहेत. शिवाय करोना चाचणी, आरोग्य चाचणी असे उपक्रमही घेतले जात आहेत. मात्र, अद्याप करोनाने पोलिसांची पाठ सोडलेली नाही. मुंबईत करोनाग्रस्त पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

लज्जास्पद; कारगिलचा हिरो धुतोय उष्टी भांडी; १९ वर्षांनी सुरू झाली पेन्शन

0

नवी दिल्ली: दिल्लीत ज्यूसच्या एका दुकानात ग्लास धुणाऱ्या या व्यक्तीला तुम्ही ओळखलंत का?… हे आहेत कारगिल युद्धातील वीर योद्धा बाऊजी (kargil war hero ). सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यांच्यावर ही पाळी आली आहे. देश साजरा करत असताना कारगिल युद्धातील हा हिरो ज्यूसच्या दुकानात उष्टी भांडी धूत बसला आहे.

आज कारगिल युद्धाला २१ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने देश आज कारगिल विजय दिन साजरा करत शहिदांना नमन करत आहे. अशा परिस्थितीत कारगिल युद्धाच्या वेळी अत्यंत दुर्गम टोलोलिंग टेकडी जिंकणार्‍या २ राष्ट्रीय राजपुताना रायफल्सच्या तुकडीचा भाग असलेले माजी बाऊजी यांनी आपल्या पराक्रमाची कहाणी सांगितली. यावेळी, ते युद्धात जखमी झाले. आजही पाकिस्तानची गोळी त्यांच्या पायात आहे. त्यामुळे त्यांना काठीचा आधार घेतल्याशिवाय चालता येत नाही. जखमी झाल्यानंतर आणि नंतर सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर, जखमी सैनिकांकडे सरकार कसे दुर्लक्ष करते याचा पाढाच त्यांनी वाचला. सरकारच्या या बपर्वाईमुळे बाऊजी अत्यंत दु:खी झाले आहेत.

सरकार फक्त शहिदांच्या मंचावर फुले अर्पण करून देशातील जनतेची मने जिंकते, पण सैनिकांबद्दल मनात अजिबात कोणताही आदर नसतो, असे बाऊजी म्हणाले. त्यांनी यावेळी सांगितले, की आपल्याला कसा तब्बल १९ वर्षे पेन्शनसाठी त्यांना लढा द्यावा लागला.

माजी लान्स नायक सतवीर बाऊजी यांनी कारगिल युद्धाच्या २१ वर्षानंतर आपले दु:ख उघड केले. मी निवृत्त झाल्यानंतर १९ वर्षे मला पेन्शन मिळाली नाही. मी संसदेत आवाज उठवला, आंदोलन केले, निदर्शने केली आणि प्रश्न उपस्थित केला. तेव्हा मला कुठे मला पेन्शन मिळाली. संरक्षण मंत्र्यांशी पत्रांद्वारे बोलल्यानंतर १९ वर्षानंतर २०१९ मध्ये निवृत्तीवेतन सुरू झाले, अशी माहिती बाऊजी यांनी दिली.

वाचा:
जखमी सैनिकांकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे अत्यंत खिन्न झाले बाऊजी सांगत होते. युद्धात जखमी झालेले सैनिक जिवंत राहतात, मात्र त्यांना कोणतेही काम न उरल्यामुळे सरकार तर त्यांना रडवून रडवून मारते. त्यांचा उदरनिर्वाह चालावा यासाठी ना त्यांच्या मुलांना नोकरी दिली जाते, ना जखमी सैनिकांसाठी काही केले जाते. मुलांच्या गरजा पूर्ण होत नाहीत, त्यांना शाळेची फी भरणे देखील शक्य होत नाही. आशा परिस्थितीमुळे हे सैनिक नाराज असतात, असे बाऊजी यांनी सांगितले.

वाचा:

आपल्याला थोडासा पैसा नक्की मिळाला, मात्र तोही खूप प्रयत्न करून मिळाला, असे सतवीर बाऊजी सांगतात. जे युद्धामध्ये जखमी होतात त्यांची जबाबदारी घरातल्या लोकांच्या शिरावर पडते. त्यांची मुले शिकूही शकत नाहीत किंवा नोकरीही करू शकत नाहीत. याचे कारण म्हणजे जखमी सैनिक त्यांच्यावर अवलंबून राहतो. आम्हाला सर्वापासून वंचित ठेवले जाते, असेबाऊजी म्हणाले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

युएईमध्ये आयपीएल खेळवणे मुंबई इंडियन्ससाठी धोक्याचे, जाणून घ्या कारण

0

यावर्षीचे आयपीएल युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. पण युएईमध्ये आयपीएल खेळवणे हे मुंबई इंडियन्सच्या संघासाठी धोक्याचे असल्याचे म्हटले जात आहे. या गोष्टीचे नेमके कारण आहे तरी काय, जाणून घ्या…

यापूर्वीही युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे बीसीसीआयला भारतात आयपीएल खेळवणे योग्य न वाटल्याने त्यांनी युएईची निवड केली. त्यामुळे आता युएईमध्येच आयपीएल खेळवण्यात येणार आहे. पण आयपीएलमध्ये सर्वाधिक जेतेपदं पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे.

यंदाचे आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने कंबर कसलेली आहे. पण मुंबई इंडियन्सच्या संघात मात्र चिंतेचे वातावरण आहे. कारण यापूर्वी जेव्हा युएईमध्ये स्पर्धा झाली होती. तेव्हा मुंबई इंडियन्सची कामगिरी चांगली झाली नव्हती. युएईमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ पाच सामने खेळला होता आणि या चापही सामन्यांमध्ये मुंबईला एकही सामना जिंकता आला नव्हता. त्यामुळे युएईमध्ये आयपीएल होणे ही मुंबई इंडियन्ससाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले जात आहे. पण दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबने मात्र पाचही सामने जिंकल्याचे पाहायला मिळते आहे.

युएईमध्ये कोणत्या संघाने किती सामने जिंकले, पाहा…
युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने किंग्ज इलेव्हन पंजाबने जिंकल्याचे पाहायला मिळते, त्यांची पाच पैकी पाच सामने जिंकले होते. त्याचबरोबर या यादीत दुसरा क्रमांक लागतो तो चेन्नई सुपर किंग्जचा कारण त्यांनी युएईमध्ये पाच पैकी चार सामने जिंकले होते. राजस्थान रॉयल्सने पाचपैकी तीन सामने जिंकले होते आणि दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैजराबाद, दिल्ली कॅपिटल्स यांनी प्रत्येकी पाच पैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला होता, पण त्यांना तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. मुंबई इंडियन्सला तर पाच पैकी एकही सामना युएईमध्ये जिंकता आला नव्हता. त्यामुळे या वर्षी मुंबई इंडियन्सचा संघ युएईमध्ये कशी कागिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

कोल्हापुरातील लॉकडाउनमध्ये उद्यापासून शिथिलता; 'या' सेवा सुरू राहणार

0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः जिल्ह्यात २० जुलैपासून सुरू केलेल्या लॉकडाउनमध्ये सोमवारपासून (ता. २७) काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. याबाबाबतचे आदेश आणि नियमावली जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी सायंकाळी जाहीर केली. हे आदेश ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत. नवीन आदेशानुसार गॅस वितरण सकाळी नऊ ते सहा सुरु राहणार आहे. शासकीय आणि खासगी मालवाहतूक, मॉल्समध्ये जीवनावश्यक वस्तू आणि धान्य विक्री करता येणार आहे. पहाटे सहा ते सायंकाळी सहापर्यंत दूध विक्री, भाजीपाला विक्रीस परवानगी आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दुकाने, व्यवसाय, सर्व व्यापारी आस्थापना सुरू राहतील. शहरी व ग्रामीण भागातील उद्योगधंदे, एमआयडीसी ५० टक्के कामगारांसह सुरू राहणार आहे.

वाचाः

सर्व बँका, इन्शुरन्स कार्यालये सुरू राहतील. पेट्रोल-डिझेल पंप सुरू राहणार आहेत. सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत प्रवासी रिक्षा वाहतुकीला परवानगी मिळाली आहे. सर्व शासकीय कार्यालयेदेखील सुरू राहणार आहेत. शॉपिंग मॉल्स, मार्केट, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, व्यायाम शाळा, केश कर्तनालये, स्पा, ब्युटी पार्लर, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग (क्वांरनटाईनसाठी तसेच वंदे मातरम योजनेंतर्गत घेतलेली हॉटेल, लॉज वगळता) बंदच राहणार आहेत. विवाह, साखरपुडा, मुंज, वाढदिवस आदी तसेच सर्व सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांनाही परवानगी नाही. सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक कामे वगळता संचारबंदी राहणार आहे. दुकाने तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये ६० वर्षावरील मालक, ग्राहक किंवा कर्मचारी म्हणून बाहेर पडता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

वाचाः

काय सुरु राहणार? व काय बंद?

दूध संकलन आणि वाहतूक सुरळीत राहणार

किराणा दुकान सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत सुरू राहणार

दूरध्वनी इंटरनेट आणि बँक एटीएम सुरू राहणार

कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योगधंदे पन्नास टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहणार

शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतीची कामे सुरू राहणार

जिल्ह्यामध्ये साखरपुडा लग्न मुंज वाढदिवस या कार्यक्रमांना बंदी राहणार

अंत्यसंस्कार आणि अंत्ययात्रेसाठी दहा नातेवाईक याना परवानगी

जिल्ह्यातील शिव भोजन थाळी सुरू राहणार

जिल्ह्यातील किरकोळ दूध विक्री सुरू राहणार

सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत जिल्ह्यामधील हॉटेल लॉज रेस्टॉरंट केशकर्तनालय ब्युटी पार्लर सलून मसाज सेंटर किराणा धान्य विक्री केंद्र सुरू राहणार

दुचाकी वर फक्त एक चालकांन चारचाकी वाहनांमध्ये तीन प्रवाशांना प्रवास करता येणार

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला करोनाची लागण

0

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याला करोनाची लागण झाली आहे. राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नसल्यानं त्यांनी करोनाची चाचणी करुन घेतली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण आणि धनजंय मुंडे यांना करोनाची लागण झाली होती. त्यातून बरे होऊन हे तिन्ही मंत्री पुन्हा कामाला लागले आहेत. तर, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनाही करोनाची लागण झाल्यानं होम क्वारंटाइन झालेले आहेत. उदगीर मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना मागील काही दिवसांपासून ताप आणि अंगदुखीमुळं त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळं त्यांनी करोना चाचणी करुन घेतली व तीचा अहवाल पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक रुग्ण आढळले होते. त्या दरम्यान बनसोडे सतत मतदारसंघात फिरत होते. तसंच, सततच्या संपर्कामुळ त्यांना करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोनाचा काळात सतत नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्यक्षात मैदानात उतरले होते.

दरम्यान, राज्यात करोनाचा वाढता कहर सुरुच आहे. आज तब्बल नऊ हजारांच्यावर करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या रुग्णांना राज्यातील विविध कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी करोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. आज राज्यात तब्बल ६ हजार ०४४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण २ लाख १३ हजार २३८ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर एक टक्क्यानं वाढ होऊन ५६. ७४ इतका झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

Latest posts