हायलाइट्स:
- मुंबईत करोनाची संभाव्य तिसरी लाट
- मुंबईत गेल्या आठ दिवसांत वेगाने वाढले रुग्ण
- नवीन करोना रुग्णांमध्ये सर्वाधिक तरूण बाधित
- तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार घाबरण्याचे कारण नाही!
आकडेवारीनुसार, २३ डिसेंबरपासून करोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. २३ डिसेंबरपर्यंत मुंबईत करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ही ७, ६८, ७५० इतकी होती. जी ३१ डिसेंबरला वाढून ७, ८५, ११० पर्यंत पोहोचली. मुंबई महापालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, केवळ आठ दिवसांत मुंबईत करोनाचे १६,३६० नवीन रुग्ण बाधित झाले आहेत.
२० ते २९ वयोगटातील सर्वाधिक रुग्ण
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, या आठ दिवसांत सर्वाधिक रुग्ण हे २० ते २९ वर्षे वयोगटातील आढळले आहेत. एकूण नवीन रुग्णांच्या संख्येत २२ टक्के म्हणजेच, ३५९९ रुग्ण हे २० ते २९ वयोगटातील आहेत. त्यानंतर २१ टक्के म्हणजेच ३४३५ रुग्ण हे ३० ते ३९ वयोगटातील आहेत. याशिवाय गेल्या आठ दिवसांत करोनाच्या नवीन रुग्णांपैकी १७ टक्के म्हणजेच, २७८१ रुग्ण हे ४० ते ४९ वयोगटातील आहेत. तर दीड टक्का म्हणजेच २४५ रुग्ण हे ८० हून अधिक वर्षे वयाचे आहेत.
मुलांमध्ये संसर्ग वाढण्याची व्यक्त केली होती शक्यता
० ते ९ वर्षे वयोगटातील २७० रुग्ण या आठ दिवसांत करोनाबाधित झाले आहेत. या संभाव्य तिसऱ्या लाटेत सर्वाधिक लहान मुले बाधित होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली होती. मात्र, गेल्या आठ दिवसांत विविध वयोगटातील नवीन करोनाबाधितांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, हा ट्रेंड बदलताना दिसतो आहे.
लक्षणे दिसून येत नसलेले रुग्ण अधिक
कोविड डेथ ऑडिट समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, करोनाच्या पहिल्या लाटेत ५० वयापेक्षा अधिक तर, दुसऱ्या लाटेत ३५ हून अधिक वय असलेल्या रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण जास्त होते. या संभाव्य तिसऱ्या लाटेत यात बदल झालेला दिसून येत आहे. सध्या तरी, कोणतीही लक्षणे नसलेले रुग्ण अधिक आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णालयांवरील ताण वाढलेला दिसून येत नाही.
आतापर्यंत ९२ टक्के खाटा उपलब्ध
मुंबईतील डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले की, मुंबईमध्ये अजूनही ९२ टक्के खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. करोनाबाधित रुग्ण वेगाने वाढत असले तरी, रुग्णालयांत दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. करोनाच्या या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी तोंडावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.