बातम्यांपासून सोशल मीडियापर्यंत रनौटने घेतलेल्या राज्यपाल भेटीची चर्चा रविवारी रंगली. तिला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दलही चर्चा सुरू होती. वांद्र्यातील कार्यालयावर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर न्यायाच्या अपेक्षेने कंगनाने ही भेट घेतली असली, तरी मूळ मुंबईकर असलेल्या कोळी, आदिवासींनी विकास प्रकल्पांसाठी आपल्या उपजीविका, घरावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे, तरी यासंदर्भात कोणताही राजकीय पक्ष आस्था व्यक्त करत नाही किंवा राज्यपालही ही समस्या समजून घेण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, म्हणून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
वरळी कोळीवाड्यातील स्थानिक रहिवासी कोस्टल रोडच्या विरोधात लढताना उपजीविकेचा प्रश्न सातत्याने मांडत आहेत. कोस्टल रोडसाठी नियोजित भागापेक्षा अधिक जागेत भराव घालण्याचे काम सुरू आहे. यामुळे हाजी अली ते वरळी किनाऱ्यावरील महापालिका शाळा या पट्ट्यात पारंपरिक पद्धतीने मिळणारे मासे आता मिळत नाहीत. मोठ्या बोटी मच्छिमारीसाठी समुद्रात आत जाऊ शकतात, मात्र पाण्यात चालत जाऊन तिथे जाळी लावून मासे पकडणारे, खडकांमध्ये खेकडे पकडणारे अशा अनेक लोकांना उपजीविकेसाठी या जागेचा आधार होता. मात्र ही जागा राजरोसपणे नष्ट होत असताना यासंदर्भात कोणताही राजकीय पक्ष बाजू मांडण्यासाठी का पुढे येत नाहीत, यासंदर्भात राज्यपालही लक्ष का देत नाहीत, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. आद्य मुंबईकर असल्याचे केवळ बोलले जाते, मात्र जेव्हा त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न असतो तेव्हा मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते, अशी भावना या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे.
आरेतील आदिवासींचीही अशीच भूमिका आहे. रॅम्पचे काम अजूनही न थांबल्याने स्थानिक आदिवासींच्या डोक्यावर टांगती तलवार कायम आहे. आरेतील कोणती जमीन संरक्षित होणार, याबद्दलही स्पष्टता नाही. त्यामुळे आरेचा प्रश्न सुटलेला नाही, अशी भावना स्थानिकांची आहे. यासंदर्भात कोणताही पक्ष थेट भाष्य करत नाही. मात्र एका अभिनेत्री सामान्य मुंबईकर म्हणून तिच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईचा निषेध करते, तिच्यासाठी राजकीय पक्ष उभे राहतात. मात्र आद्य निवासी म्हणून मान मिळवलेल्या आदिवासींच्या घरांचा प्रश्न, विविध प्रकल्पांमध्ये त्यांची शेतजमीन जाणार असल्याची चर्चा याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले जाते. ही दुटप्पी भूमिका का, असा मुद्दा वनशक्तीचे संचालक डी. स्टॅलिन यांनी उपस्थित केला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times