अंधेरी एमआयडीसी येथे कामावर जाण्यासाठी चुनाभट्टी ते कुर्ला आणि कुर्ला ते घाटकोपर असा लोकलने प्रवास. घाटकोपरवरून मेट्रोमार्गे अंधेरी. अंधेरी मेट्रो स्थानकाहून चालत किंवा रिक्षाने एमआयडीसीमध्ये कामावर हजर असे पूर्वीचे चित्र. आता लोकल बंद आहेत. ३०२, १८१ या बेस्ट बस चूनाभट्टीहून अंधेरी गाठायची. बसमध्ये गर्दी असल्यास थांब्यावर न थांबताच गाड्या पुढे जातात. लोकल नसल्याने शोधायची कशी? जगायचे कसे याच चिंतेत दिवस ढकलत आहोत, अशी व्यथा नोकरी गमावलेल्या गुरुराज सपकाळ याने मांडली.
मुंबईत असे लाखो ‘गुरुराज’ आहेत. कामावर जाण्यासाठी लोकलव्यतिरिक्त अन्य पर्यायांचा महागडा प्रवास अनेकांना शक्य नसतो. आता सर्व क्षेत्रे सुरू झाली. लॉकडाउनमध्ये नोकरी गमावलेल्या अनेकांमध्ये गुरुराजही आहे. अनलॉकमध्ये नोकरी शोधण्यासाठी तरी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी गुरुराज आणि सामान्य मुंबईकरांची आहे. चुनाभट्टीहून बेस्टच्या दोनच बस अंधेरीसाठी धावतात. त्यांच्या फेऱ्याही कमी आहेत. एखाद्या थांब्यावर प्रवासी उतरणारा नसल्यास तो थांबा वगळला जातो. त्या थांब्यावरून प्रवासी गाडीत येईल, असा विचारही केला जात नाही, असे अनेक अनुभव मुंबईकरांना नवे नाहीत.
वाचा:
१० महिन्यांपासून सर्वांसाठी लोकल बंद आहेत. बसमध्ये प्रचंड गर्दी आहे. ‘लोकलमधील गर्दीतच करोना होतो का’, असे प्रश्न सरकारी अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना हास्यास्पद वाटत असले, तरी हेच वास्तवाशी निगडीत आहे. ‘करोना मारेल, त्याआधी बेरोजगारीच्या तणावातच जीव जातो की काय हीच भीती मनात असते. नोकरी नसल्याने घरात चिडचिड होते. कौटुंबिक आरोग्य बिघडते. याचा त्रास कुटुंबातील सर्वांनाच सहन करावा लागतो’, असे गुरुराज सांगतो. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’आहे. म्हणून त्यांचा सांभाळ करण्यासाठी, नोकरी शोधण्यासाठी लोकल प्रवासाला परवानगी द्यावी, अशी सामान्य मुंबईकरांची मागणी आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times