महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलं तो मतदारांचा अपमान आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सगळ्या पक्षांवर राज ठाकरे यांनी टीका केली. आज कोणी कोणाला मतदान केलं? कोण कुठे सत्तेवर आहे? कोण कोणासोबत गेलं आहे? हे महिना दीड महिना महाराष्ट्राने खूप ऐकलं, खूप वाचलं. मतदारांची अशाप्रकारची प्रतारणा ही भाजपानेही केली आणि शिवसेनेनेही केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं तर काही विचारायलाच नको असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“निवडणूक निकालानंतर एक चांगला भाग मला दिसला तो असा आहे की निवडणुकीसाठी म्हणून ज्यांनी पक्षांतरं केली होती त्यातले बरेचसे पडले. किंबहुना महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना पाडलं. अशा प्रकारचा धडा महाराष्ट्राच्या जनतेने शिकवला ते चांगलंच झालं” असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. ” सत्तेसाठी या पक्षांनी जी काही जनतेची प्रतारणा केली ती बाब दुर्दैवी आहे. अशा लोकांना जनतेने जागा दाखवली होती. मात्र पुढे आपल्या नशीबात हे असं वाढून ठेवलं जाईल हे जनतेला तरी काय ठाऊक होतं? एक गोष्ट मात्र निश्चित आहे की जे घडलं त्यामुळे लोकांमध्ये नाराजी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. याचा परिणाम पुढच्या निवडणुकांवर, मतदानावर होऊ शकतो ” असंही राज यांनी स्पष्ट केलं.