भाजपा नेते आणि हरयाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी लाइव्ह पेट्रोल बॉम्ब असल्याचं वादग्रस्त वक्तव्य वीज यांनी केलं आहे. त्यांनी ट्विट करत राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला.
प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्यापासून सावधान राहा, कारण ते लाइव्ह पेट्रोल बॉम्ब आहेत, असं वादग्रस्त ट्विट अनिल वीज यांनी केलं आहे. ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आग भडकते आणि सार्वजनिक संपत्तीचं नुकसान होतं, असंही त्यांनी नमूद केलं आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांना मंगळवारी मेरठमध्ये अडवण्यात आलं होतं. हे दोघेही मेरठमध्ये CAA आणि NRC विरोधात जे आंदोलन झालं त्यामध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयाच्या भेटीसाठी हे दोघे जात होते. त्यानंतर वीज यांचं वक्तव्य समोर आलं आहे.