शिवसेना खासदार संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत का? या चर्चेला उधाण आलं आहे. याचं कारणही तसंच आहे. संजय राऊत यांनी लिहिलेली एक फेसबुक पोस्ट. या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी जो मजकूर लिहिला आहे त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत हे उद्धव ठाकरेंवर नाराज आहेत अशी चर्चा रंगली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी संजय राऊत यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. ‘हमेशा ऐसे व्यक्ति को संभाल के रखिये जिसने आपको ये तीन भेंट दी हो, साथ, समय और समर्पण.’ या पोस्टसाठी संजय राऊत यांनी निवडलेला फोटोही सूचक आहे. एका हातातून वाळू निसटताना दाखवण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालात खरंतर महायुतीला कौल मिळाला होता. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार ही भूमिका सातत्याने संजय राऊत यांनी लावून धरली. एवढंच नाही तर शरद पवारांना वारंवार भेटून त्यांना शिवसेनेची बाजू समजावून सांगणं, काँग्रेस नेत्यांची भेट घेणं. महाविकास आघाडीला आकार देणं यामध्ये संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा होता हे महाराष्ट्रानं पाहिलं आहे. रोज सकाळी संजय राऊत पत्रकार परिषद घेत होते. त्यातून त्यांची भूमिका मांडत होते. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे ते सांगत राहिले. दुसरीकडे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी झटत राहिले. आता त्यांनी जी फेसबुक पोस्ट लिहिली आहे त्यावरुन ते उद्धव ठाकरेंवर नाराज आहेत अशी चर्चा रंगली आहे. कारण त्यातून त्यांनी असं सूचित केलं आहे की अशा व्यक्तींना कायम सांभाळा जी व्यक्ती तुम्हाला साथ, वेळ आणि समर्पण देते.
संजय राऊत हे मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिवशीही गैरहजर होते. एकूण ३६ जणांनी त्या दिवशी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला संजय राऊत यांची अनुपस्थिती जाणवत होती. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय राऊत नाराज आहेत अशी चर्चा त्यादिवशी रंगली होती. मात्र या चर्चांना अर्थ नाही असं दस्तुरखुद्द संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. या स्पष्टीकरणाला दोन दिवस उलटत नाहीत तोच संजय राऊत यांनी जी फेसबुक पोस्ट लिहिली आहे त्यावरुन ते उद्धव ठाकरेंवर नाराज आहेत का? अशी चर्चा रंगली आहे.