मुंबई – उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भावाला स्थान न मिळाल्याने शिवसेना नेते संजय राऊत हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्रिपदावरून असलेली नाराजी आणि खातेवाटपाबाबत मोठे विधान केले आहे. खातेवाटपासून महाविकास आघाडीमध्ये कुठलीही कुरबूर नाही.

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेमध्ये निर्माण झालेल्या नाराजीबाबतही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ”मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिवसेनेतील काही नेते नाराज आहेत, हे खरे आहे. पण महाविकास आघाडीती शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह केवळ 15 मंत्रिपदे आली आहेत. त्यातून छोटे मित्रपक्ष आणि अपक्षांनाही शिवसेनेने वाटा दिला आहे. आघाडीतील मोठा पक्ष या नात्याने आम्ही शब्दाला जागून मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. आता मंत्रिपद मिळावे असे प्रत्येकाला वाटत असते, तसे वाटणे हा काही गुन्हा नाही. मात्र आता नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे हे स्वत: लवकरच सर्वांशी बोलतील आणि त्यातून मार्ग काढतील,”असे राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही यावर माझा विश्वास नाही, असे सांगत राऊत यांनी भास्कर जाधव यांना टोला लगावला. तसेच दिवाकर रावते आणि रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. ते मंत्रिपदासाठी तडफड करणारे नाही, असेही राऊत यांनी सांगितले.

17 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here