पुणे : भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसे शिवसेनेमध्ये जाणार असल्याच्या वृत्ताचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खंडन केले आहे. खडसेंची केंद्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि माझ्याशी भेट झाली. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, यामुळे ते शिवसेनेत जाणार असल्याच्या वृत्ताला काही अर्थ नसल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे.जळगावमध्ये एकनाथ खडसे, माजी मंत्री गिरीष महाजन आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाली. मात्र, यामध्ये नाराजीवर चर्चा झाली नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. आज चंद्रकांत पाटील पुण्यामध्ये होते. यावेळी त्यांना यावर छेडण्यात आले. शिवसेनेकडे खडसेंना देण्यासाठी आहे तरी काय, कोल्हापूरमध्ये शिवसेना विरोधकांना जाऊन मिळली त्यामुळे भाजपाला अपयश आले. आम्हाला हरवण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागले, सोलापूर, सांगलीत आम्ही आलो हे लक्षात असू द्यावे, अशी बोचरी टीका पाटील यांनी शिवसेनेवर केली.