सध्याच्या घडीला करोनामुळे सर्वच जण हैराण आहेत. त्यामुळे क्रिकेटही ठप्प आहे. क्रिकेट सुरु असले की खेळाडूंचे उत्पन्नही सुरु असते. पण सध्याच्या घडीला करोनामुळे क्रिकेटपटू आपल्या घरामध्येच असल्यामुळे त्यांचे उत्पन्नांचे साधनही नसल्याचे म्हटले जात आहे. पण बीसीसीआय गेल्या दहा महिन्यांपासून क्रिकेटपटूंना कोणतीही मदत करत नसल्याचे आता समोर आले आहे.
भारतीय क्रिकेटर्स संघटनेचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी बीसीसीआयवर गंभीर आरोप केले आहेत. मल्होत्रा यावेळी म्हणाले की, ” सध्याच्या घडीला भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर आहेत. पण गेल्या दहा महिन्यांमध्ये बीसीसीआयने खेळाडूंना कोणतीही मदत केल्याचे पाहायला मिळत नाही. त्यामुळे या गोष्टीकडे गांगुली यांनी लक्ष द्यायला हवे, असे मला वाटते.”
बीसीसीआय बऱ्याच योजना राबवत असते. ज्यामध्ये माजी क्रिकेटपटूंना आणि निधन झालेल्या क्रिकेटपटूंच्या पत्नीला पेन्शनही देण्यात येते. त्याचबरोबर बीसीसीआयने काही वर्षांपूर्वी आयपीएलच्या माध्यमातून माजी क्रिकेटपटूंना एकरकमी आर्थिक मदतही केली होती. पण सध्याच्या घडीला बीसीसीआयवर गंभीर आरोप झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मल्होत्रा पुढे म्हणाले की, ” बीसीसीआय बऱ्याच योजना राबवत असते. पण या योजनांचा जर क्रिकेटपटूंना फायदा होत नसेल तर त्याचे काय करायचे, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. काही क्रिकेटपटूंचे बरेच वय झालेले आहे. काही क्रिकेटपटू हे ७० वर्षांच्याही पुढील आहेत. हे क्रिकेटपटू बीसीसीआयच्या मदतीची वाट पाहत असतात. पण त्यांना जर वेळेत मदत मिळाली नाही, तर या योजनांचा त्यांना फायदा होऊ शकणार नाही. त्यामुळे या क्रिकेटपटूंना बीसीसीआयने लवकर मदत करायला हवी. जेणेकरून त्यांचे प्रश्न सुटू शकतील. बीसीसीआयने माझ्या मागण्यांवर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times