ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीने आज अखेर निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियातील विश्वचषक आता आयसीसीने पुढे ढकलला आहे. पण त्याचबरोबर भारतामध्ये होणारा विश्वचषकही आयसीसीने पुढे ढकलला असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतामध्ये २०२१ आणि २०२३ या दोन वर्षांमध्ये दोन विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. पुढील वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक आहे, तर २०२३ साली ५० षटकांचा विश्वचषक खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवणे हे जोखमीचे आहे, असे म्हटले होते. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयावर आयसीसीने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. कारण यजमान देश जर स्पर्धा भरवण्यात असमर्थ असेल तर ती कशी आयोजित करता येऊ शकते, हा प्रश्न आयसीसीला पडला होता. त्यानुसारच आयसीसीने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. पण हा विश्वचषक आता पुढे कधी खेळवणार, याबाबत मात्र आयसीसीने काहीही सांगितलेले नाही.

भारताने मात्र कधीही विश्वचषक खेळवण्यासाठी असमर्थता दर्शवलेली नाही. त्यामुळे आयसीसीने भारतातील विश्वचषक पुढे का ढकलला, हा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे. याबाबत बीसीसीआय आयसीसीबरोबर काही संवाद साधणार आहे का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

भारतामध्ये २०२३ साली ५० षटकांचा विश्वचषक होणार आहे. हा विश्वचषक यापूर्वी मार्च आणि एप्रिल महिन्यात खेळवण्यात येणार होता. पण हा विश्वचषक आयसीसीने आता पुढे ढकलला आहे. आता हा विश्वचषक याच वर्षी (२०२३) पण नोव्हेंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे.

करोनामुळे काही काळ वाया गेला आहे. त्यानंतर क्रिकेट सुरु झाले की, सर्वच स्पर्धा एकाच वेळेला होऊ शकत नाही. ठराविक कालावधीनंतर मोठ्या स्पर्धा खेळवल्या जात असतात. त्यामुळे या विश्वचषकाच्या पात्रता फेरीसाठी आयसीसीला जास्त वेळ लागणार असल्याचे समजते आहे. त्यामुळेच आयसीसीने मार्च-एप्रिलमधील विश्वचषक हा नोव्हेंबर महिन्यामध्ये खेळवण्याचे ठरवले आहे.

ऑस्ट्रेलियातील विश्वचषक आयसीसीने रद्द केला आहे. पण हा विश्वचषक कधी खेळवण्यात येणार, याबाबत मात्र आयसीसीने कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली पाहायला मिळत नाही. कारण सध्याच्या घडीला करोनाचे वातावरण आहे. या वातावरणावर आयसीसी लक्ष ठेवून आहे. त्यामुळे ही परिस्थिती निवळल्यानंतरच आयसीसी योग्य तो निर्णय घेईल, असे म्हटले जात आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here