ऋषभच्या कारला झालेल्या अपघातामुळे पुन्हा एकदा सीट बेल्टचा विषय चर्चेत आला आहे. वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर आवश्यक असतो. पंतनं कार चालवत असताना सीट बेल्ट लावलेला नव्हता. त्यानं सीट बेल्ट लावला असता तर त्याला झालेल्या जखमांची तीव्रता कमी झाली असती. पंत मर्सिडीज बेन्झ जीएलसी कारमधून त्याच्या उत्तराखंडमधील घरी जात होता. मर्सिडीज बेन्झ जीएलसी प्रीमियम एसयूव्ही कार आहे. कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स आहेत. मात्र पंतनं सीट बेल्ट वापरला नसल्यानं कारला अपघात झाल्यानंतर एअरबॅग उघडल्या नाहीत. त्यामुळे पंत विंडशिल्ड फोडून बाहेर आला. पंतनं सीटबेल्ट लावला असता तर एअरबॅग्स उघडल्या असत्या आणि ऋषभला कमी इजा झाली असती.
रस्ते वाहतूक आणि हायवे मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात तब्बल १६ हजारांहून अधिक जणांचा अपघाती मृत्यू सीटबेल्ट न लावल्यामुळे झाला. यातील निम्मे प्रवासी मागच्या सीटवर बसलेले होते. २०२१ मघ्ये १६ हजार ३९७ जणांचा मृत्यू वाहनातून प्रवास करताना सीटबेल्ट न लावल्यामुळे झाला. यातील ७ हजार ९५९ जण मागच्या सीटवर बसून प्रवास करत होते. सीटबेल्ट न लावल्यानं मृत्यूमुखी पडलेल्या चालकांची संख्या ८ हजार ४३८ इतकी आहे.
उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या कारला चार महिन्यांपूर्वी मुंबई-अहमदाबाद मार्गावर अपघात झाला. मिस्त्री यांची मर्सिडीज कार भरधाव वेगानं दुभाजकाला आदळली. पालघरमधील नदीच्या पुलावर हा अपघात झाला. त्यावेळी मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावलेला नव्हता. त्यामुळे एअरबॅग उघडली गेली नाही. ही चूक मिस्त्री यांच्यासाठी जीवघेणी ठरली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times