करोनानंतर क्रिकेट पुन्हा एकदा सुरु झाले असले तरी त्याचे काही नवीन नियम बनवण्यात आले आहे. या नवीन नियमांनुसारच आता क्रिकेट खेळावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने नवीन नियम मोडला होता. त्यामुळे त्याला एका कसोटी सामन्यात खेळता आले नव्हते. ऑस्ट्रेलियामध्येही काही नवीन नियम बनवण्यात आले आहेत.
भारताचे खेळाडू आयपीएल खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जाणार आहेत. तोपर्यंत करोनाचे संकट कमी झालेले पाहायला मिळू शकते. त्यामुळे एकदा का क्रिकेट रुळावर आले की, झटपट सामने आणि मालिका खेळवण्यात येतील. त्यावेळी काही दिवसांचा मोठा गॅप दिसणार नाही. कारण सध्याच्या घडीला चार महिने क्रिकेट ठप्प होते. ही सर्व कसर भरून काढायची असेल आणि क्रिकेटला पुन्हा पूर्वपदावर आणायचे असेल तर काही गोष्टी कराव्या लागणार आहेत.
भारतीय खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियाने काही नियम सांगितले आहेत आणि या नियमांचे पालन भारतीय खेळाडूंना करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर भारतीय संघाला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यानंतर ते सराव सुरु करू शकतात आणि त्यानंतर मालिका खेळवली जाऊ शकते. या सर्व गोष्टींचा कालावधी पाहिला तर भारतीय संघ जवळपास महिनाभर ऑस्ट्रेलियामध्ये खेळू शकणार नाही. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ट्वेन्टी-२०, वनडे आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना मात्र हा नियम जास्त पटलेला दिसत नाही. त्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाकडे खेळाडूंना एक आठवड्यासाठी क्वारंटाइन करावे, अशी विनंती केली होती. कारण खेळाडू १४ दिवस फक्त हॉटेलमध्ये बसून राहणे योग्य नाही, असे गांगुली यांना वाटत होते. पण यावेळी गांगुली यांची विनंती ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळानी फेटाळली आहे. त्यामुळे बीसीसीआय ऑस्ट्रेलियाचा दौराच रद्द करणार, असे काही जण म्हणत आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times