करोनाच्या काळात भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारताला आज एक सुवर्णपदक मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हाला या गोष्टीवर कदाचित विश्वास बसणार नाही, पण ही गोष्ट घडलेली आहे.

सध्याच्या घडीला सर्व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा या स्थगित करण्यात आलेल्या आहे. काही स्पर्धा रद्द तर काही पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या काळात भारतीय संघ कसे काय सुवर्णपदक जिंकू शकते, हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. पण भारताला आज एक सुवर्णपदक मिळाल्याचे दिसत आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा ही २०१८ साली खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने १६ सुवर्ण, २३ रौप्य आणि ३१ कांस्यपदकांची कमाई केली होती. भारताने या स्पर्धेत ४ बाय ४०० या रीले प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. या स्पर्धेत बेहरिनने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. पण बेहरिनच्या संघातील केमी अँडेकोया ही उत्तेजन सेवन चाचणीमध्ये दोषी आढळली आहे. त्यामुळे आता बेहरिनचे सुवर्णपदक काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे भारताच्या रौप्यपदकाचे रुपांतर आता सुवर्णपदकामध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे. या सुवर्णपदकामुळे भारताच्या खेळाडूंचे ऑलिम्पिकसाठी मनोबल उंचावू शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे भारताकडून आता रौप्यपदक मागवण्यात येणार असून खेळाडूंच्या हातामध्ये काही दिवसांमध्येच सुवर्णपदक पाहायला मिळणार आहे.

भारताच्या या संघात जगप्रसिद्ध धावपटू हिमा दासचाही सहभाग होता. हिमाबरोबर भारतीय संघात मोहम्मद अनास, पुवम्मा आणि अरोकिया राजीव यांचा समावेश होता. त्यामुळे आता या चारही भारताच्या धावपटूंना सुवर्णपदक दिले जाणार आहे. त्यामुळे भारताच्या एकूण अॅथलेटीक्समधील पदकांची संख्या आता २०वर येऊन ठेपली आहे.

याबाबत भारताच्या अॅथलेटीक्स संघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी सांगितले की, ” आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यामध्ये आता आठ सुवर्णपदकांचा समावेश झाला आहे. भारताच्या अॅथलेटीक्स पदकांची संख्या आता एकूण २०वर गेली आहे. या सुवर्णपदकाचा नक्कीच भारताच्या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी तयारी करताना फायदा होणार आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here