यापूर्वी आयपीएल २६ सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याचे आपण सर्व ऐकत होतो. पण आता काही दिवसांपूर्वी आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरु करण्यात येणार असल्याचे समजते आहे. आयपीएल यावेळी एक आठवडा लवकर का खेळवण्यात येत आहे, जाणून घ्या महत्वाचे कारण…

ऑस्ट्रेलियातील विश्वचषक आणि आशिया चषक या दोन महत्वाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आणि आयपीएलचा मार्ग सुकर झाला. आयपीएल भारतात खेळवणे धोक्याचे असल्याचे बीसीसीआयला वाटले आणि त्यांनी आयपीएल युएईमध्ये खेळवण्याचा मार्ग निवडला. पण पूर्वी जी आयपीएलची तारीख जाहीर करण्यात आली होती, त्यापेक्षा एक आठवडा लवकर यावेळी आयपीएल खेळवले जाणार असल्याचे समजते.

यावर्षी आयपीएल एक आठवडा लवकर खेळवण्यात येणार आहे, कारण आयपीएलनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेल्यावर भारतीय संघाला प्रथम १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे. जर आयपीएल एक आठवडा उशिरा खेळवली गेली असती तर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियामध्ये १४ दिवस क्वारंटाइन होण्यासाठी जास्त वेळ मिळाला नसता. त्यामुळे आयपीएल एक आठवडा लवकर खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

भारतीय खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियाने काही नियम सांगितले आहेत आणि या नियमांचे पालन भारतीय खेळाडूंना करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर भारतीय संघाला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्यानंतर ते सराव सुरु करू शकतात आणि त्यानंतर मालिका खेळवली जाऊ शकते. या सर्व गोष्टींचा कालावधी पाहिला तर भारतीय संघ जवळपास महिनाभर ऑस्ट्रेलियामध्ये खेळू शकणार नाही. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ट्वेन्टी-२०, वनडे आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना मात्र हा नियम जास्त पटलेला दिसत नाही. त्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाकडे खेळाडूंना एक आठवड्यासाठी क्वारंटाइन करावे, अशी विनंती केली होती. कारण खेळाडू १४ दिवस फक्त हॉटेलमध्ये बसून राहणे योग्य नाही, असे गांगुली यांना वाटत होते. पण यावेळी गांगुली यांची विनंती ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळानी फेटाळली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here