भारतामध्ये एका दिवसात जवळपास ४०-५० हजार करोनाचे रुग्ण सापडत आहेत. पण ही परिस्थिती लवकरच निवळेल, असे भारताच्या क्रीडा खात्याला वाटत असावे. कारण यापूर्वी मे महिन्याच्या अखेरीपासून भारतीय खेळाडूंना सराव करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे सराव झाल्यानतंर स्पर्धा कधी खेळवल्या जातील, असे काही जणांचे म्हणणे आहे.
भारतामध्ये सप्टेंबरपासून क्रीडा स्पर्धांना सुरुवात होऊ शकते, अशी महत्वाची घोषणा आज क्रीडा मत्र्यांनी केली आहे. पण या स्पर्धा सुरु करताना सुरक्षेचे उपायही केले जाणार आहेत. गेल्या आठवड्यापासून ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनी आपला सराव सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. आता लवकरच क्रीडा स्पर्धाही चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत.
याबाबत भारताचे क्रीडा मंत्री रिजिजू यांनी सांगितले की, ” सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापासून भारतामध्ये क्रीडा स्पर्धांना आम्ही सुरुवात करणार आहोत. यामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढायला मदतही होईल. आम्ही क्रीडा स्पर्धा सुरु करणार असलो तरी सुरक्षेचे उपायही यावेळी केले जाणार आहेत. करोनानंतर स्पर्धा भरवताना नवीन नियम बनवले जाणार आहे. हे नियम आम्ही सर्व संघटकांना पाठवणार आहोत. हे नियम खेळाडूंनाही लागू असतील.”
रिजिजू पुढे म्हणाले की, ” खेळाडूंनी आता सराव करायला सुरुवात केली आहे, हे पाहून मला आनंद झाला आहे. करोनानंतर स्पर्धा कशा भरवल्या जातील, नवीन नियम काय असतील, याबाबत मी राष्ट्रीय संघटनांबरोबर बोललो आहे. यापुढे स्पर्धा भरवायच्या असतील तर नेमक्या काय गोष्टी कराव्या लागतील, यावर आमची चर्चा झाली आहे. कारण स्पर्धा सुरु झाल्यावर बरीच लोकं एकत्रित येतील. तर काही गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतील. त्यामुळे कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या टाळायच्या याबाबत आमची चर्चा झालेली आहे. यापुढे नियम पाळूनच सर्व स्पर्धा भरवण्यात येतील.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times