आजच्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने २६९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धची ही मालिका २-१ अशी जिंकली आहे. पण या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एक विक्रम रचल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर २० वर्षांपूर्वीच्या एका विक्रमाशीही बरोबरी करण्यात आली आहे.

इंग्लंडने आपला दुसरा डाव २२६ धावांवर घोषित करत वेस्ट इंडिजपुढे ३९९ धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडच्या या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा दुसरा डाव १२९ धावांमध्ये आटोपला. त्यामुळे इंग्लंडला २६९ धावांनी विजय मिळवता आला. या डावात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्स यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. वोक्सने यावेळी इंग्लंडचा अर्धा संघ ५० धावांत आटोपला. तर ब्रॉडने ३६ धावांमध्ये चार विकेट्स मिळवत या विजयात मोलाचा वाटा उचलला. चार विकेट्ससह ब्रॉडने या सामन्यात विक्रमालाही गवसणी घातली आहे.

या सामन्याच्या पहिल्या डावात जेव्हा ब्रॉडने सहा बळी मिळवले, तेव्हाच त्याला हा विक्रम खुणावत असल्याचे पाहायला मिळाले होते. पण दुसऱ्या डावात त्याला विकेट मिळेल की नाही, याबाबत साशंकता होती. कारण या सामन्यात पावसाने चांगलाच गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे ब्रॉड या सामन्यात विक्रम रचणार की त्याला अजून एक सामना खेळावा लागणार, याबाबत कोणालाही कळत नव्हते. पण अखेर ब्रॉडने विकेट मिळवली आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला. कारण ब्रॉडची कसोटी क्रिकेटमधील ही पाचशेवी विकेट होती.

या सामन्यात ब्रॉडने कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये ५०० बळी मिळवण्याचा विक्रम केला असून तो जगभरातील सातवा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने ५०० बळी मिळवण्याची किमया साधली होती. त्यानंतर ब्रॉड हा इंग्लंडचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये पहिले तीन फिरकीपटू आहेत. त्यामुळे सर्वाधिक विकेट्स मिळवणारा ब्रॉड हा जगातला चौथा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

ब्रॉड आणि अँडरसन यांनी २० वर्षांपूर्वीच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. २००० साली ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न आणि स्विंग गोलंदाज ग्लेन मॅग्रा यांनी पाचशे विकेट्स पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर कोणत्याही देशांतील दोन गोलंदाजांना ही किमया साधणे जमले नव्हते. पण आता ब्रॉड आणि अँडरसन यांनी २० वर्षांपूर्वीच्या या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here